10 हजारांची मागणी, पैसे न दिल्यानं बेदम मारलं; पोलीस कॉन्स्टेबलच्या मारहाणीत BTech विद्यार्थ्याचा मृत्यू
पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हा तरुण बीटेकचे शिक्षण घेत होता. या मारहाणीची व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक कॉन्स्टेबल या तरुणाला पकडून उभा आहे, तर दुसरा त्याला काठीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळाते. ही घटना मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये घडली आहे.
मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव उदित गायके असे आहे. या घटनेनंतर भोपाळ झोन-२ चे डीसीपी विवेक सिंह यांच्या सूचनेनुसार, दोन्ही आरोपी कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना लवकरच अटक केली जाईल असे विवेक सिंह यांनी सांगितले. मृत विद्यार्थ्याच्या मित्राने या घटनेची माहिती दिली. तो म्हणाला, 'सर्व मित्र रात्री इंद्रपुरी परिसरात पार्टी करत होते. दीडच्या सुमारास घरी परतताना उदितने रस्त्याच्या कडेला असलेल्या पोलिसांना पाहिले.तो घाबरून एका गल्लीत पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडून बेदम मारहाण करायला सुरुवात केली'. जेव्हा उदितने हात जोडून पोलिसांकडे 'मला मारु नका' असे म्हणत विनवणी केली. तेव्हा त्या दोघांनी उदितकडे १०,००० रुपयांची मागणी केली. दोघे त्यांना मारहाण करत राहिले. त्यानंतर उदितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, असे उदितच्या मित्राने सांगितले.पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण समोर आले. त्याच्यावर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात पोलीस कॉन्स्टेबल दोषी आढळले आहेत. हत्येच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती डीसीपी विवेक सिंह यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.