महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विदर्भात राबवत असलेल्या धाडसत्रांमुळे प्रशासनाची झोप उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच महसूल विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या भूखंड खरेदी-विक्रीची नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयात एका अधिकाऱ्याच्याच ड्रॉव्हरमध्ये रोख रक्कम आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
अशातच आता विदर्भातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राप्तिकर विभागाकडून विदर्भात सध्या मोठ्या कारवाया सुरू आहेत. इन्कम टॅक्स विभागाने आतापर्यंत 25 उपनिबंधक कार्यालयांवर केलेल्या कारवायांमध्ये हादरवणारी माहिती समोर आली आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या या झाडाझडतीत अंदाजे 20 हजार कोटींचे व्यवहार संशयाच्या कचाट्यात सापडले आहेत. 25 उपनिंबधक कार्यालयांमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून सुमारे 20 हजार कोटींचे व्यवहारांची माहिती आर्थिक व्यवहार विवरणपत्रामध्ये नसल्याची माहिती समोर आली आहे.
इन्कम टॅक्स विभागाने केलेल्या छापेमारीत विदर्भातील तब्बल 15 हजार व्यवहार अडचणीत सापडले आहेत. जवळपास २० हजार कोटींच्या दरम्यान या व्यवहारांची रक्कम असल्याचं बोललं जात आहे. या सर्व व्यवहारांची स्टेटमेंट ऑफ फायनान्शिअल ट्रान्जॅक्शनमध्ये नोंद नसल्याची माहिती समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं महसूल खातं मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. इन्कम टॅक्स विभागानं कारवाई केलेल्यांमध्ये खामला येथील 4 सह दुय्यम निबंधक कार्यालय, नागपूर ग्रामीणमधील सह दुय्यम निबंधक कार्यालय, अमरावती, हिंगणा उपनिबंधक कार्यालय यांच्यासह यवतमाळमधील 3, वर्धा येथील 2, अकोला येथील 3, मलकापूरमधील 1 अशा 25 कार्यालयांचा समावेश आहे.उपनिबंधक कार्यालयांच्या या वादात सापडलेल्या आर्थिक व्यवहारांमुळे सरकारच्या महसूल विभागाला मोठा फटका बसला आहे.स्टेटमेंट ऑफ फायनान्शिअल ट्रान्जॅक्शनमध्ये नोंद करण्यास उशीर झाल्यास प्राप्तिकर कायद्यानुसार रोज 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. प्राप्तिकर विभागाकडून संबंधित उपनिबंधक कार्यालयांवर दंड आकारला जाणार आहे. याबाबतची इन्कम टॅक्स विभागाने तातडीनं प्रक्रियाही सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. राज्य महसूल विभागाला जबाबदारी निश्चित करून ही रक्कम जमा करावी लागणार आहे.महसूलमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच सावनेर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट दिली होती. त्यावेळी या कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. नागपूर शहरातील खामला भागातील सह दुय्यम उपनिबंधक वर्ग 2 कार्यालयाबाबत पैसे घेतल्याशिवाय कुठलीच नोंदणी केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या. याची दखल घेऊन बावनुकळे थेट कार्यालयात धडकले होते. यावेळी बावनकुळेंना सह दुय्यम उपनिबंधक कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्याच ड्रॉव्हरमध्ये रोख रक्कम आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.