Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इस्लामपूर येथील महिलेची 35 लाखांची फसवणूक

इस्लामपूर येथील महिलेची 35 लाखांची फसवणूक

इस्लामपूर : मासेमारी व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने इस्लामपूर येथील महिलेची तब्बल 35 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दापोली तालुक्यातील दाम्पत्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुक्ताई दत्ताराम चोगले, दत्ताराम नामदेव चोगले (रा. पाजपंढरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. फसवणूकप्रकरणी आशाराणी शिवाजी पाटील (वय 49, रा. इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. फसवणूकीचा हा प्रकार 23 नोव्हेंबर 2023 ते 29 एप्रिल 2024 दरम्यान घडला.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दोन वर्षापूर्वी आशाराणी व त्यांचे पती शिवाजी हे दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथे फिरायला गेले होते. तेथे त्यांची ओळख मुक्ताई व दत्ताराम या दाम्पत्याशी झाली. या ओळखीतून त्यांचे कौटुंबिक आणि विश्वासाचे संबंध निर्माण झाले. चोगले दाम्पत्याने आपला मासेमारीचा व्यवसाय असून बोटीचा परवानाही असल्याचे पाटील यांना सांगितले. 'जर तुम्ही या व्यवसायात पैसे गुंतवले, तर तुम्हाला चांगला आर्थिक फायदा मिळेल', असे आमिष दाखवले. 'बोटीकरिता 35 लाख रुपये लागतील' असे सांगून त्या बदल्यात दोन वर्षांपर्यंत दर महिन्याला 2 लाख रुपये देण्याचे त्यांनी आश्वासन दिले.

इस्लामपूर येथून आशाराणी यांनी नोव्हेंबर, डिसेंबर 2023 या महिन्यात बोटीच्या जाळ्यासाठी 15 लाख रुपये चोगले दाम्पत्याला दिले. त्यानंतर पतसंस्थेचे कर्ज काढून आणखी 20 लाख रुपये दिले. एप्रिल 2024 मध्ये दोघांच्या व्यवहाराचे करारपत्र करण्यात आले. त्या करारानुसार, चोगले यांनी महिन्याला 2 लाख रुपये देण्याचे लेखी मान्य केले होते. काही दिवसांनी चोगले यांनी आशाराणी यांचे फोन घेणे बंद केले. संशय आल्याने आशाराणी व त्यांचे पती हर्णे बंदर येथे गेले. तेथे चौकशी केली असता, चोगले दाम्पत्य पत्त्यावरून निघून गेले होते.

आणखी दोघांना गंडा?

चोगले याने बोट चालवण्याचा परवाना व 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील करारपत्राचा फोटो पाटील यांच्या मोबाईलवर पाठवला. बोटीचा परवाना मिळाला आहे, व्यवसाय सुरू करायचा आहे, ठरल्याप्रमाणे पैसे देऊ, असे संशयित सांगत होते. आशाराणी हर्णे बंदर येथे गेल्यानंतर चोगले दाम्पत्याने खोटी कागदपत्रे पाठवल्याचे समोर आले. चोगले यांनी अशाप्रकारे आणखी दोघांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.