डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं गूढ 6 महिन्यांनी उकललं; डॉक्टर पतीनंच थंड डोक्यानं संपवलं; एका शंकेमुळे उलगडा
बंगळुरु: बंगळुरुत एका डॉक्टर महिलेच्या मृत्यूचं गूढ ६ महिन्यांनी उकललं आहे. डॉक्टर महिलेची हत्या तिच्याच डॉक्टर पतीनं केल्याची माहिती समोर आली आहे. सर्जन डॉक्टर महेंद्र रेड्डीनं पत्नी डॉक्टर कृतिका रेड्डीची हत्या करुन तिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवलं.
कृतिका व्हिक्टोरिया रुग्णालयात डर्मटोलॉजिस्ट होत्या. मृत्यू होण्यापूर्वी काही दिवस त्या आजारी होत्या. एप्रिल २०२५ मध्ये कृतिका वडिलांच्या घरी राहत होत्या. तब्येत बरी नसल्यानं महेंद्रनंच त्यांना माहेरी सोडलं होतं. कृतिकाला तिचा पती महेंद्रनं दोन दिवस आयव्ही इंजेक्शन दिले. त्यामुळे २३ एप्रिलला कृतिका यांची प्रकृती बिघडली. त्यावेळी महेंद्र तिथेच होता. कृतिका बेशुद्ध पडली होती. पण डॉक्टर असूनही महेंद्रनं तिला सीपीआर दिला नाही. कृतिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथल्या डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यावेळी मराठाहल्ली पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
सहा महिन्यांनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबचा अहवाल आला. कृतिका यांच्या शरीरात ऍनेस्थिशिया ड्रग प्रोप्रोफोल आढळून आलं. हे औषध केवळ ऑपरेशन थिएटरमध्ये वापरलं जातं. त्यामुळे पोलिसांना शंका आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. कृतिका यांची हत्या झाल्याची शंका पोलिसांना होती. आरोपी डॉक्टर महेंद्र रेड्डीला मणिपालमधून अटक करण्यात आली.कृतिकाची बहीण डॉक्टर निकिता रेड्डीनं हत्येचा संशय व्यक्त करत पोलीस तक्रार दाखल केली होती. तो संशय खरा ठरला. महेंद्र रेड्डीनं कृतिकाची अतिशय थंड डोक्यानं हत्या केली. तिचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं भासवलं. पण मेहुणीला आलेल्या संशयानं महेंद्र रेड्डीचं बिंग फुटलं. आरोपीच्या कुटुंबावर अनेक गुन्हे आहेत. मात्र लग्न करताना त्यांनी ही बाब लपवली होती. माझ्या लेकीनं पतीवर विश्वास ठेवला. पण त्यानं विश्वासघात केला, अशा भावना कृतिकाच्या वडिलांनी व्यक्त केल्या. महेंद्र रेड्डीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी कृतिकाच्या कुटुंबानं केली आहे. महेंद्रनं हत्येचा कट कसा रचला, त्यात त्याला कोणी मदत केली का, याचा तपास पोलीस करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.