Big Breaking...! अजित पवार गटातील बड्या नेत्यानं दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'ऑपरेशन लोटस' राबवत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. सोलापूरमधील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि माढ्याचे माजी आमदार यशवंत माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
याचवेळी राजन पाटील यांनी राज्यमंत्री दर्जाचे महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. राजन पाटील हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी अजित गटाकडूनच त्यांना सहकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाले होते. भाजपमध्ये येताच त्यांनी, “राष्ट्रवादीकडून मला हे पद मिळाले आहे, म्हणून मी राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा,” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली.
हे पद राज्यमंत्री दर्जाचे असल्याने अजित पवार गटाला हा दुहेरी धक्का आहे. यापूर्वी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्या या नियुक्तीवरून टीका केली होती. “निष्ठेला महत्व नाही म्हणता मग सहकार परिषदेचे अध्यक्ष कसे झालात?” असा सवाल उपस्थित करून उमेश पाटील यांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला होता.
मोहोळ तालुक्यातील हे नेते स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला बळकटी देणार आहेत. यशवंत माने आणि रणजित शिंदे यांनाही भाजपमध्ये घेण्यात आले. या घडामोडींमुळे अजित पवार गटात अस्थिरता वाढली असून, सोलापूरमधील राजकारणात नवे वळण आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.