Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत ३ लाखांचे खाद्यतेल, ४६ किलो बर्फी साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्र

सांगलीत ३ लाखांचे खाद्यतेल, ४६ किलो बर्फी साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्र
 
 
सांगली : अन्न व औषध प्रशासनाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मिठाई, खवा, फरसाण, चिवडा आदी अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर दोन महिन्यांपासून छापासत्र सुरू केले आहे. या कारवाईत ३ लाख ८३ हजारांचा खाद्यतेलाचा साठा, ४६ किलो बर्फीचा साठा, तसेच ४७ किलो भगर व भगरपीठ जप्त केले आहे.

सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, फरसाण, चिवडा आदी पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. काही ठिकाणी भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाच्या पदार्थाची विक्री होते. त्यामुळे अन्न-औषध प्रशासनाकडून संबंधित ठिकाणी छापे मारून तेल, तूप, दूध आदी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. यंदाही जिल्ह्यात ११ ऑगस्टपासून छापासत्र सुरू आहे. आतापर्यंत १६० ठिकाणच्या तपासणीमध्ये दुधाचे ३५ नमुने, खवा-मावा ११, तूप २८, खाद्यतेल ३०, मिठाई ५७, ड्रायफ्रूटस् १७, चॉकलेट ११, भगर १४ तसेच रवा, बेसन, आटा आदींचे ३६ असे एकूण २३९ नमुने विश्लेषणासाठी घेतले. ते प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले आहेत. 
 
तपासणीनंतर ४७ अन्न व्यावसायिकांना सुधारणांच्या नोटिसा पाठवल्या आहेत. ९ व्यावसायिकांचे परवाने निलंबित केले आहेत. चार अन्न आस्थापनांच्या तपासणीत ९८४ लिटर व ३ लाख ८३ हजार ५८१ रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. एका अन्न आस्थापनेकडून ४६ किलोचा १४ हजार ३७५ रुपयांचा बर्फीचा साठा जप्त केला, तसेच एका दुकानातून ४७.३ किलोचा ४ हजार ५५७ रुपयांचा भगर, भगरपिठाचा साठा जप्त केला आहे. दिवाळीत देखील ही कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे अन्नपदार्थ विक्रेत्यांनी सर्व अन्नपदार्थ चांगल्या व आरोग्यदायी वातावरणात बनवून त्याची विक्री करावी. शिळे अन्नपदार्थ विक्री केले जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश मसारे यांनी केले आहे.


पदार्थ ताजा असल्याची खात्री करा

ग्राहकांनी मिठाई व इतर दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना ते ताजे असल्याची खात्री करावी. खरेदी केल्यानंतर ते लवकर संपवून टाकावेत किंवा फ्रीजमध्ये योग्य तापमानात ठेवावेत. त्यामुळे या पदार्थापासून अपाय होणार नाही. सणासुदीच्या काळात ग्राहकांनी सतर्क राहावे. कोठेही भेसळयुक्त किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होत असल्याचे आढळल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार करावी. - नीलेश मसारे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.