सांगली : सध्या वकिलांपासून न्यायाधीशांपर्यंत संविधानाचे पालन न करता कायद्याचा वापर करीत असल्याचे दिसून येते. सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी संविधान पायदळी तुडविण्याचे काम होत आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे वकिलांनी आपल्या बुद्धीचा वापर
लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते ॲड.
असीम सरोदे यांनी केले. ते सांगलीत एका कार्यक्रमासाठी आले असता तेथे बोलत
होते.
ते म्हणाले, गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटना पाहता, सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाल्याचे चित्र आहे. काही घटना पाहिल्या की, न्यायव्यवस्था संविधानाचे पालन करते का?, असा प्रश्न पडतो. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडून त्यांच्या चिन्हासह आमदारांना पळविले गेले. हा खटला न्यायालयात गेला. वास्तविक पाहता न्यायाधीशांना कायद्याच्या, संविधानाच्या आधारे यावर नियंत्रण आणून योग्य न्याय देता आला असता, परंतु त्यांनी ते केले नाही. कायद्यातील पळवाटा काढून आपली जबाबदारी झटकली. हे सर्व चित्र महाराष्ट्राने पाहिले.अशा अनेक घटना कायद्याच्या क्षेत्रात घडत आहेत. त्यामुळे सामान्यांना न्याय मिळवून देणे अवघड बनत चालले आहे. न्याय विकत मिळतो, हे दिसून येत आहे. परंतु कायद्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपण संविधानाचे पालन करतो, याचा विवेक ठेवणे आवश्यक आहे. ते म्हणाले, वकील हे कोणत्याही जातीचे, धर्माचे असोत, ते संविधान माणणारे असावेत. सध्या वकिलांमध्ये देखील दुफळी निर्माण करण्यात आली आहे. प्रत्येकजण आपली जात, पक्ष घेऊन लोकांना त्यांच्या पद्धतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. वास्तविक पाहता हे चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माणणारे आपण असल्यामुळे संविधानाचा आदर हा केलाच पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.