Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी

भाजपपाठोपाठ मिरजेत राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, मैनुद्दीन बागवान यांच्याकडून नवीन पक्षाची नोंदणी
 

सांगली : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीच सांगली-मिरजेच्या राजकारणात "स्वतःचा पक्ष, स्वतःची आघाडी" हा ट्रेंड झपाट्याने वाढू लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनी 'जनसंघर्ष विकास आघाडी' या नावाने पक्ष नोंदवून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली होती. आता माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनीही "मिरज शहर स्वाभिमानी आघाडी" नावाने स्वतंत्र पक्षाची नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला झटका दिला आहे. या दोन स्वतंत्र पक्षांच्या नोंदणीमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांची गणिते बिघडणार असून मिरज पॅटर्नच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

महापालिकेच्या राजकारणात मिरज पॅटर्नची चर्चा बऱ्याच वर्षांपासून होत आहे. मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक निवडणुकीपुरतेच एकमेकाविरोधात लढतात. आता एका पक्षात असलेले नगरसेवक पुढच्या निवडणुकीत त्याच पक्षात असतील, याचा काही नेम नाही. त्याचा प्रत्यय प्रत्येक निवडणुकीवेळी मिरजकरांना आला आहे. परिणामी या पॅटर्नने राजकीय पक्ष, नेत्यांना अनेकदा हादरे दिले आहेत.


यंदाच्या महापालिकेच्या निवडणुकीतही मिरजेत नवनवे प्रयोग होणार असल्याचे संकेत आहे. त्याची सुरुवात भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी यांनीच केली. आवटी यांनी भाजपला धक्का देत जनसंघर्ष विकास आघाडी या नावाने पक्षाची नोंदणी केली आहे. आवटींचा हा पवित्रा निवडणुकीच्या शेवटपर्यंत कायम राहणार की दबावतंत्रांचे राजकारण ठरणार, याचीच चर्चा आहे.

आता माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी मिरजेच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. बागवान हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत. ते आमदार जयंत पाटील समर्थक मानले जातात. पण आता त्यांनीही मिरज शहर स्वाभिमानी आघाडी या नावाने पक्षाची नोंदणी करीत राष्ट्रवादी व जयंत पाटील या दोघांना धक्का दिला आहे. बागवानांच्या नव्या आघाडीने राष्ट्रवादीच्या तळात अस्वस्थता निर्माण केली आहे. या आघाडीचे बागवान अध्यक्ष आहेत, तर चंद्रकांत हुलवान कार्याध्यक्ष व शिवाजी दुर्वे उपाध्यक्ष असतील.

बागवान यांच्या नव्या आघाडीत सध्या तरी तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीच्या दारात उभ्या असलेल्या या दोन नवीन आघाड्यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या "सेफ झोन" असलेल्या प्रभागांवरही परिणाम होणार आहे. मिरजेतील जातीय समीकरणे लक्षात घेऊन काही आजी-माजी नगरसेवकांनी या आघाडीशी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.