Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यातल्या कॉलेजमुळे गेली लंडनमधील नोकरी, दलित तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणतोय, 'आम्ही पुढे जातोय हे नकोय तुम्हाला'

पुण्यातल्या कॉलेजमुळे गेली लंडनमधील नोकरी, दलित तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, म्हणतोय, 'आम्ही पुढे जातोय हे नकोय तुम्हाला'
 

लंडनमध्ये नोकरी मिळवलेल्या प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाची नोकरी पुण्यातील एका कॉलेजमुळे गेली. असा दावा करणारा व्हिडीओ त्यानं शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. आणि नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. युरोप-अमेरिकेत जाऊन नोकरी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. काही जण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात, चांगला अभ्यास करतात आणि उच्च शिक्षण घेतात. अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या तरुणानं लंडनमध्ये नोकरी मिळवली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यातील एका कॉलेजमुळे त्याची नोकरी गेली. परिणामी, या तरुणानं इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओद्वारे आपली नाराजी आणि दुःख व्यक्त केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चला पाहूया हा तरुण व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणतोय. 
(फोटो सौजन्य - marathichawdi/Instagram)

 
काय म्हणाला तरुण?
हा व्हिडिओ marathichawdi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण लंडनमधील एका भल्या-मोठ्या इमारतीसमोर उभा आहे. तो म्हणतो, "या कंपनीत मी काम करत होतो. पण आता ओळखपत्र परत करायला चाललो आहे, कारण पुण्याच्या कॉलेजमुळे माझी नोकरी गेली. कंपनीने त्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी आहे का, पण कॉलेजने 'नाही' असं उत्तर दिलं.

याच कॉलेजने युनिव्हर्सिटी अ‍ॅप्लिकेशनच्या वेळी दोन शिफारसी दिल्या होत्या, पण यावेळी त्यांनी नकार दिला. कारण आम्ही पुढे जातोय हे त्यांना आवडलं नाही. ही फक्त नोकरी नव्हती हा माझा, माझ्या पालकांचा, माझ्या शिक्षकांचा आणि माझ्या समाजाचा अनेक वर्षांचा संघर्ष होता. मला बाबासाहेबांचं वाक्य आठवतंय. 'शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे."
(फोटो सौजन्य - marathichawdi/Instagram)
 

कोण आहे हा तरुण? ​

व्हिडिओच्या कॅप्शननुसार या तरुणाचं नाव प्रेम बिऱ्हाडे असं आहे. या उच्चशिक्षित तरुणाला लंडनमध्ये नोकरी मिळाली होती, पण  प्रक्रियेदरम्यान पुण्यातील कॉलेजने "हा आमचा विद्यार्थी नाही" असं उत्तर दिल्याने कंपनीनं त्याला नोकरीवरून काढलं. मात्र, हे कोणतं कॉलेज आहे याची माहिती त्यानं दिलेली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ ५ लाख २३ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकरी या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतंय की या तरुणानंच काहीतरी गडबड केली असावी म्हणून कॉलेज असं वागलं, तर काहींनी त्याच्यावर "विक्टिम कार्ड" खेळत असल्याचे आरोप केले आहेत.
 



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.