Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नाशिकचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी निलंबित..बोगस भरती प्रकरण भोवले

नाशिकचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी निलंबित..बोगस भरती प्रकरण भोवले
 

मालेगाव : बोगस शिक्षक भरतीला मान्यता देण्याचे प्रकरण नाशिकच्या जिल्हा परिषदेतील तीन बड्या अधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. या भरतीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगवारी झाल्यामुळे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक अशा तिघा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

येथील मालेगाव हायस्कूलमध्ये सेवाजेष्ठता डावलून नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना तेरा वर्षापासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाची २ कोटी ६९ लाख ५६ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच या.ना.जाधव विद्यालयातील कर्मचारी भरतीत घोटाळा झाल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. हे दोन्ही गुन्हे नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहेत.

 
मालेगाव हायस्कूल प्रकरणी दाखल गुन्ह्यात नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचा शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व तत्कालीन कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गेल्या महिन्यात त्यांना अटक केली होती. तसेच लोकमान्य विद्यालयातील भरती घोटाळ्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याचा सहभाग असल्याचे आढळून आल्याने त्याला देखील तेव्हा अटक झाली होती. एकाच दिवशी तिघा बड्या अधिकाऱ्यांना अटक झाल्यामुळे शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती.

काय आहे प्रकरण ?
संस्थाचालक व अधिकाऱ्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याची तक्रार जैनब मोहम्मद या शिक्षिकेने दिल्यानंतर येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जैनब व सिमा तरन्नुम निहाल अहमद या दोन्ही शिक्षिका २०१३ पासून मालेगाव हायस्कूलमध्ये उपशिक्षिका म्हणून विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत होत्या. या दोन्ही शिक्षिकांना २०२३ मध्ये २० टक्के अनुदान तत्वावर घेण्यात आले. त्यानंतर याच शाळेत जून २०२४ मध्ये नोकरीस लागलेले अन्य १३ शिक्षक सन २०१२ ते २०२१ या काळात या शाळेत सेवेत असल्याचे बनावट कागदपत्र तयार करून संस्थेने शिक्षण अधिकाऱ्यांकडे संच मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविले. त्यानुसार प्रस्ताव मंजूर झाल्याने या १३ शिक्षकांना १०० टक्के अनुदान लागू झाले. मागील तारखेपासून दाखविण्यात आलेल्या सेवेमुळे या शिक्षकांनी थकीत वेतनापोटी २ कोटी ६९ लाख ५६ हजार १९४ रुपये पदरात पाडून घेतले, त्यामुळे शासनाची व आम्हा दोघा शिक्षिकांची फसवणूक झाली आहे,असे जैनब मोहम्मद यांनी तक्रारीत नमूद केले आहे. 
 
याप्रकरणी पोलिसांनी अंजुमन मोईनु तुलबा संस्थेचा चालक मोहम्मद इसाक खलील अहमद,शाळेचा प्राचार्य जाहिद हुसेन,लिपिक नासिर हुसेन,वरिष्ठ लिपिक अबू हुरेरा व महापालिका शिक्षण मंडळ शाळेतील शिक्षक नवीद अख्तर आदींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील नवीन अख्तर याने या प्रकरणात दलालाची भूमिका निभावल्याचा संशय आहे. त्याच्या विरोधात अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे अन्य गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्याला यापूर्वीच सेवेतून निलंबित केले आहे. तसेच लोकमान्य विद्यालयात कर्मचारी भरती घोटाळ्याप्रकरणी संस्थाचालक व अन्य तीन जणांविरोधात मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बोगस कर्मचारी भरतीला मान्यता देताना जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. अटक केल्यावर यातील शिक्षणाधिकारी पाटील व कार्यालयीन अधीक्षक पगार हे दोघे अद्याप तुरुंगात आहेत. देवरे याची मात्र जमिनीवर मुक्तता झालेली आह . ४८ तासांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिलेल्या या तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत पाठविण्यात आला होता. त्यानुसार शासन स्तरावरून तिघांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.