सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्व देणारा दिलदार नेता, राजकारणाचे बाळकडू मिळूनसुद्धा आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारा आणि कार्यकर्त्यांच्या ओठात,पोटात आणि हृदयात विराजमान असलेला सर्व स्तरातील कार्यकर्त्यांची फळी नेहमी सोबत बाळगणारा,संघर्षयोद्धा म्हणजे माजी मंत्री स्व.मदनभाऊ पाटील.
शब्दांच्या प्रचंड ताकतीने
कार्यकर्त्यांची मने जिंकण्याची दैवी देणगीच त्यांना प्राप्त होती. जे
बोलायचं ते पण रोखठोक आणि वेगळ्या खास स्टाईलमध्ये. त्यांचं नेतृत्व मोठं
असलं तरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे त्यांची खूप बारीक नजर असायची.
सामान्य कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम करणारा एक असामान्य नेता अशीच
त्यांची जनमानसात प्रतिमा होती.
सांगली जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांपासून
सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत कोणाच्याही पाठीशी भाऊ उभा राहिले की
त्यांच्या अंगात शंभर हत्तीच बळ यायचं. विविध निवडणुकीत त्यांचे नेटवर्क
गल्ली-बोळापर्यंत असल्याचा अनुभव भल्याभल्यांनी घेतला. सांगली महानगरपालिका
त्यांचे सत्ता केंद्र होते. प्रचंड उर्जेचा स्त्रोत असलेला आणि
कार्यकर्त्यांना मनस्वी ताकद देणारा हा पोशिंदा स्वतः मात्र मनाने खुपच
हळवा होता.परिघाबाहेर जावून कार्यकर्त्यांवर विश्वास टाकणे ही त्यांची
खासियत. त्यांच्या या स्वभाव गुणधर्मामुळेच सांगलीच्या राजकीय पटावर अनेक
चेहरे-मोहरे तयार झाले. कार्यकर्त्याची निष्ठा,गुणवत्ता आणि सचोटी तपासून
त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना नेतृत्व दिले.
राजकारणापेक्षा अधिक समाजकारण करा हाच त्यांचा कार्यकर्त्यांना आदेश असायचा. विरोधकाला विरोध म्हणून कधीच राजकीय द्वेष केला नाही. ताकाला जाऊन मोघा लपवायचा नाही अशी त्यांच्या कामाची पद्धत होती. क्रीडाक्षेत्रावर विशेष प्रेम करणारे हे नेतृत्व राजकारणात ही अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्याकडे असणाऱ्या संघटन कौशल्यामुळे आमदार,खासदार व मंत्री झाले.हे सगळं करत असताना त्यांना विरोधकांशी दोन हात करण्याबरोबरच स्वकीयांशीही संघर्ष करावा लागला.त्यातही ते संघर्षयोद्धा ठरले.सांगली जिल्ह्याच्या राजकारणात स्वत:ची वेगळी क्रेझ निर्माण करणारे, सामान्य घरातील कार्यकर्त्यांना मानाचे स्थान देत कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, याकरिता केलेली कमिटमेंट पाळणारे नेतृत्व म्हणून स्व.मदनभाऊ पाटील यांची सदैव ओळख राहिली आहे. राजकारणात सर्व कार्यकर्त्यांना एकाचवेळी खूश ठेवता येत नसते. तरीही कार्यकर्त्यांवर त्यांची अशी विलक्षण पकड होती. कारण आपल्या कार्यकर्त्यांसाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी, हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य होते. सांगलीचे स्वाभिमानी नेतृत्व, माजी मंत्री स्व.मदनभाऊ पाटील यांना जयंतीदिनी भावपुर्ण आदरांजली..!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.