पलूस, इस्लामपूरमध्ये 'जीएसटी' पथकांचे छापे; पलूसला बनावट बिलाद्वारे घोटाळा; इस्लामपुरात करचुकवेगिरीच्या संशयातून कारवाई
इस्लामपूर, सांगली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाच्या दोन पथकांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस आणि इस्लामपूरमध्ये कारवाई केली. रामानंद नगर येथील पत्त्यावर नोंद असलेल्या फर्मच्या नावे बनावट बिलाद्वारे बारा कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले. इस्लामपुरात एका तंबाखू व्यापाऱ्यावर
कारवाई करण्यात आली. पलूस तालुक्यातील रामानंदनगर येथील पत्त्यावर 'एस. आर.
मेटल' या नावाने दिल्लीतील गोविंद सिंग नामक एका व्यक्तीने फर्मची जीएसटी
नोंदणी केली आहे. त्याद्वारे बनावट बिले करून १२ कोटींचा जीएसटी घोटाळा
केल्याचे समोर आले आहे.
याबाबत कोल्हापूर विभागाला माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय जीएसटीच्या कोल्हापूर विभागाच्या अन्वेषण शाखेच्या पथकाने आज रामानंदनगर येथे पडताळणीसाठी जाऊन तपासणी केली असता नमूद पत्त्यावर प्रत्यक्षात कोणतीही फर्म अस्तित्वात नसल्याचे समोर आले. तसेच या पत्त्यावर नोंदणी केलेल्या 'एस.आर. मेटल' या फर्मने जीएसटीची बनावट बिले सादर करून १२ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. या बनावट नोंदणीचा मुख्य सूत्रधार दिल्लीतील गोविंद सिंग हा व्यक्ती असल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रीय जीएसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रामानंदनगरमधील संबंधित पत्ता आणि नोंदणी तपासली असता या पत्त्यावर कोणतेही कार्यालय आढळून आले नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री ही फर्म अस्तित्वात ठेवून बनावट चलने तयार करण्यात आली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इस्लामपुरातही कारवाई
दरम्यान,
इस्लामपुरातील एका तंबाखूच्या व्यापाऱ्यावर पुणे व कोल्हापूर जीएसटी
विभागातील अधिकाऱ्यांनी छापा टाकला. कर चुकवल्याच्या संशयावरून या
व्यापाऱ्याच्या घरी, फॅक्टरी, तसेच व्यवसायाच्या ठिकाणी छापा टाकून पथकाने
कागदपत्रे, संगणक ताब्यात घेतले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू
होती. एकूणच आर्थिक व्यवहार, उलाढाली याबाबतीत चौकशी व माहिती घेण्याचे
काम सुरू होते. शहर आणि परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा
सुरू होती. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नसली, तरी
इस्लामपूर पोलिसांकडे चौकशी केली असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला.
पोलिसांकडून खात्री
कवठेमहांकाळमध्ये काही दिवसांपूर्वी अधिकारी असल्याचे भासवून एका टोळीने डॉक्टरला लुटले होते. त्यामुळे इस्लामपुरात व्यापाराच्या घरी जीएसटी अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करत असल्याची माहिती मिळाल्यावर इस्लामपूर पोलिसांनी संबंधित कारवाईच्या ठिकाणी जाऊन खात्री केली. पोलिसांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते जीएसटीचे अधिकारी असल्याचे खात्री केल्यावर पोलिस निघून गेले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.