उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. याच भेटीवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. शिवाय यावेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेबाबात मोठा दावा देखील केला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी शिंदेंना, महापालिका निवडणुकीनंतर तुमचा पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल, असं सांगितलं आहे, असा दावा राऊतांनी केला.
शिवाय जेव्हा सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? यावर सुनावणीची तारीख जवळ येते. तेव्हा शिदेंचे पाय लटपटतात आणि ते दिल्लीला जातात. रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात, अशी टीकाही राऊतांनी केली. तर एकनाथ शिंदेंना त्यांच्या मालकांशी चर्चा करावी लागते, असा टोला लगावत याआधी ते शिवसेनेत होते तेव्हा मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनावर दिल्लीतील नेत्यांना यावं लागायचं. पण त्यांनी चोरलेला पक्ष असल्यामुळे त्यांना शिवसेना कळत नाही, इतिहास माहीत नाही, असंही राऊत म्हणाले.
प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व हे राज्यांमध्येच असतं
तर शिवसेना हा एक प्रादेशिक पक्ष असून प्रादेशिक पक्षाचे नेतृत्व हे राज्यांमध्येच असते. त्यांची मुख्य कार्यालये राज्यात असतात. ती दिल्लीत नसतात. चंद्राबाबू नायडू त्यांच्या पक्षाचा काम घेऊन दिल्लीत जात नाहीत. आता यांचे मालक दिल्लीत असल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागतं, असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.