कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा
मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी:,
मिरज महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
मिरज: चलनात असलेल्या पाचशे, दोनशे रुपयांच्या नोटांसारख्याच हुबेहुब नोटा बनविणाऱ्या कोल्हापूर येथील टोळी मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने उघडकीस आणली. या टोळीकडून ९९ लाख २९ हजार ३००
मुल्यांच्या बनावट नोटांसह इतर साहित्य असे एक कोटी ११ लाख सहा हजार ९००
रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष
म्हणजे बनावट नोटा बनविणाऱ्या या टोळीचा मास्टर माईंड इब्रार इनामदार हा
कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे
यांनी पत्रकार बैठकीत दिली.
इब्रार आदम इनामदार (४४, रा. विश्वकर्मा अपार्टमेंट, कसबा बावडा, कोल्हापूर), सुप्रीत काडाप्पा देसाई (वय-२२, रा. गडहिंग्लज), राहूल राजाराम जाधव (३३, रा. लोकमान्यनगर, कोरोची ता. हातकणंगले), नरेंद्र जगन्नाथ शिंदे (४०, रा. वनश्री अपार्टमेंट, टाकाळा, राजारामपुरी, कोल्हापूर) आणि सिध्देश जगदीश म्हात्रे (३८, रा. रिध्द गार्डन, ए.के. वैद्य मार्ग, मालाड (पूर्व), मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत.टोळीतील एक संशयित सुप्रीत देसाई हा बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने मिरजेत आला होता. महात्मा गांधी चौक पोलिसांच्या पथकाने त्याला जेरबंद करत ४२ हजार रुपये मुल्य असलेल्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्याच्याकडे केलेल्या अधिक तपासात कोल्हापूर येथील टोळीची माहिती मिळाली. यात बनावट नोटा तयार करण्याचे काम राहूल जाधव करत होता तर संशयित सुप्रीतसह मुख्य सुत्रधार इब्रार इनामदार, नरेंद्र शिंदे हे बनावट नोटांचे विविध भागात वितरीत करण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले.या टोळीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत जाधवचा शोध घेतला असता, कोल्हापूरातील रुईकर कॉलनी येथील एका कार्यालयात मशिनव्दारे तो हुबेहुब बनावट नोटांची छापाई करत असल्याचे समोर आले. त्यानंतर राहुल जाधवला ताब्यात घेत पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात मुख्य सुत्रधार इनामदार आणि शिंदे हे मोटारीतून बनावट नोटा घेवून जात असताना पोलिसांच्या हाती लागले. या नोटा घेण्यासाठी मुंबईहून आलेल्या सिध्देश म्हात्रे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या टोळीचा कारनामा समोर आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.