पुसेगाव, ता. २५ : औंध उपसा सिंचन योजनेत नव्याने खटाव तालुक्यातील पाच गावांचा समावेश झाल्याने आता ही योजना एकूण २१ गावांसाठी लाभदायी ठरणार आहे. पाच वाढीव गावांचा गावांचा औंध योजनेत समावेश करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाचे पत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना प्राप्त झाले आहे. औंध उपसा सिंचन योजनेत वंचित पाच गावांचा समावेश करण्याचा शब्द ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला होता. त्यासाठी स्थानिक शिष्टमंडळाची राज्यपाल, मुख्यमंत्री, जलसंपदामंत्र्यांबरोबर बैठक घेऊन या योजनेच्या प्रस्तावाला गती देण्याचे प्रयत्न केले होते. पाच वाढीव गावांसह आता या योजनेत औंध, त्रिमली, कुमठे, गणेशवाडी, जायगाव, नांदोशी, गोपूज, करांडेवाडी, खबालवाडी, गोसाव्याचीवाडी, पळशी, लांडेवाडी, वरुड, खरशिंगे, अंभेरी, वाकळवाडी, कोकराळे, भोसरे, लोणी, धकटवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली या २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
औंध उपसा सिंचन योजनेद्वारे औंध परिसरातील गावांना शेतीसाठी पाणी देण्याकरिता कण्हेर जलाशयातून सव्वा टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या पाण्याद्वारे ८ हजार ८८१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या योजनेसाठी पाणी उपलब्धता झाली असून, उर्ध्वगामी नलिका, पंप विसर्ग, पूर्व संभाव्यता अहवाल, पंपिंग मशिनरी, परिगणाकांना स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळून प्रकल्पाची पीक रचनाही मान्य करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ४९३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने जून २०२४ मध्ये या योजनेला मान्यता दिली आहे.राज्यपालांनी मान्यता दिलेल्या या योजनेत पाच वाढीव गावांचा समावेश करून एकूण २१ गावांच्या योजनेस ८ ऑक्टोबर २०२५ रोजी शासनाची मान्यता मिळाल्याचे पत्र जलसंपदा विभागाने कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची मान्यता मिळताच या योजनेची निविदा प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले.
वंचित गावे सिंचनाखाली
उरमोडी, जिहे- कठापूर, तारळी योजनांचे पाणी माण- खटावमधील मतदारसंघात येत आहे. आता टेंभू योजनेची कामे वेगाने सुरू आहेत. वाढीव आंधळी उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला गेली आहे. जल फेरनियोजनात जिहे-कठापूर योजनेला वाढीव पाणी मिळवले आहे. त्यातून माणमधील वंचित गावे सिंचनाखाली येणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.