Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे

निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
 

मुंबई : नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असली तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार की वेगवेगळी, याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. 
 
एका निवडणुकीनंतर लगेच तिचा निकाल जाहीर केला तर बहुमत मिळालेल्या पक्षाला दुसऱ्या निवडणुकीत त्याचा फायदा होईल हा तर्क देऊन मतमोजणी एकत्र करून तिघांचेही निकाल शेवटी जाहीर केले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, पहिल्या निवडणुकीपासून तिसऱ्या निवडणुकीचे अंतर किमान दोन महिन्यांचे असेल. अशावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम गोदामांमध्ये सांभाळून ठेवणे जिकिरीचे आहे.



जिल्हाधिकाऱ्यांची बैठक ३० ऑक्टोबरला होणार
राज्य निवडणूक आयोगाने ३० ऑक्टोबरला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक बोलविली आहे. या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी हे निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील.
आधी नगरपालिका की? आयोग घेणार कानोसा

आधी जिल्हा परिषद पंचायत समिती की नगरपालिकांची निवडणूक घ्यायची? याबाबत आयोग बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची मते जाणून घेईल, अशी शक्यता आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जि.प. निवडणूक आधी घेण्यासारखी परिस्थिती आहे का, याविषयी जिल्हाधिकारी काय सांगतात ते महत्त्वाचे असेल.

नियम काय सांगतो?
नैसर्गिक आपत्तीत सरकारकडून दिल्या जात असलेल्या मदतीला निवडणूक आचारसंहितेचा अडसर येऊ शकत नाही हा नियम आहे. याचा अर्थ आचारसंहितेच्या काळातही ही मदत थेट बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. आयोगाने तसे केले तर सत्तारूढ महायुतीतील पक्षांना मदत होईल, या उद्देशानेच आचारसंहिता काळात आणि विशेषतः निवडणूक चार-आठ दिवसांवर असताना आपत्तीग्रस्तांना मदत दिली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ शकतो. हा आरोप होऊ नये मात्र त्याचवेळी मानवी दृष्टिकोनातून आपत्तीग्रस्तांना मदतही पोहोचावी हा विचार करून राज्य निवडणूक आयोग आधी नगरपालिका निवडणूक घेईल, अशीच शक्यता अधिक आहे, असे सांगितले जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.