Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हिंमत असेल तर समोर या, पक्षात कशाला येता?' फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप आमदार डिस्टर्ब..

'हिंमत असेल तर समोर या, पक्षात कशाला येता?' फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप आमदार डिस्टर्ब..
 

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात  मोठ्या प्रमाणात 'मेगा इनकमिंग' होण्याची चिन्हं दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील प्रभावी नेत्यांना पक्षात सामावून घेण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. मात्र, या नव्या पक्षप्रवेशांच्या हालचालींमुळे पक्षातील कार्यकर्त्यांबरोबरच काही विद्यमान आमदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अलीकडेच झालेल्या बैठकीत सांगितले होते की, “पक्षात सामील होणाऱ्या नव्या नेत्यांचे स्वागत करावं आणि त्यामुळे निर्माण होणारी नाराजी संवादातून मिटवावी.” परंतु या वक्तव्यानंतरही काही ठिकाणी नाराजी दाटून येताना दिसत आहे. विशेषतः हडपसर विधानसभा मतदारसंघात या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातील पाच नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळीही हडपसर मतदारसंघातून एका स्थानिक नेत्याचा प्रवेश झाल्याने आमदार योगेश टिळेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा संभाव्य नवीन प्रवेशांच्या चर्चेमुळे त्यांच्या नाराजीचा विषय चर्चेत आला आहे. टिळेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून आपली भूमिका थेट मांडली आहे. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसले तरी ही पोस्ट “प्रवेश इच्छुक नेत्यावर” असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
 
त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे "ठरवलं होतं तुझ्याबद्दल बोलायचं नाही, पण दररोज तुझे कटकारस्थान आणि नाटक बघून एकदाच बोलतो. पराभवाची एवढी भीती वाटते का? हिम्मत असेल तर समोर ये, लढा मैदानात. माझ्या पक्षात यायची गरजच काय. थोड्या दिवसात लाइव्ह येणार, तारीख आणि वेळ लवकर सांगतो."

या पोस्टनंतर टिळेकरांच्या नाराजीने भाजपच्या पुणे संघटनात नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे. एकीकडे पक्षश्रेष्ठींनी नवे चेहरे आणण्याची तयारी सुरू केली असताना, दुसरीकडे स्थानिक नेत्यांचा विरोध हा आगामी निवडणूक रणनीतीवर परिणाम करू शकतो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, येत्या दिवाळीपूर्वी भाजपमध्ये मोठ्या 15 नव्या प्रवेशांची योजना आखली गेल्याची माहिती समोर आली आहे. 
 
या यादीतील सर्वात मोठा धक्का काँग्रेसला बसणार असल्याचे संकेत आहेत. काँग्रेसचा एक बडा शहर नेते आपल्या 5-6 माजी नगरसेवकांसह भाजपात प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. पक्षातील गटबाजी आणि स्थानिक नेतृत्वातील मतभेदांमुळे त्यांनी भाजपात येण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. याशिवाय, अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते आणि रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) कार्यकर्ते देखील भाजपात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
 
त्यामुळे दिवाळीपूर्वी पुण्यात राजकीय रंगत वाढण्याची चिन्हं आहेत. मात्र या सर्व गतीने सुरू असलेल्या “इनकमिंग” प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, विद्यमान कार्यकर्ते आणि काही आमदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता पक्षासाठी आव्हान ठरू शकते. फडणवीस यांच्या स्पष्ट संकेतांनंतरही स्थानिक स्तरावर गटबाजीचा स्वर वाढत असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे निवडणूकपूर्व संघटनात्मक संतुलन राखण्याचं मोठं आव्हान आता भाजपच्या पुणे नेतृत्वासमोर उभं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.