जालन्याला निघालेल्या गाडीतील कोट्यावधी रुपयांची रोकड वाटून घेतली... अख्ख्या पोलीस स्टेशनलाच थेट घरचा रस्ता
नागपूरमार्गे जालन्याला निघालेल्या गाडीमधून जप्त केलेली 3 कोटी रुपयांची रक्कम आपआपसात वाटून घेतल्याप्रकरणी एसडीओपी, ठाणेदारासह 10 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. गैरव्यवहार करणे, संशयास्पद वागणूक, कामात बेजबाबदारपणा आणि दिरंगाईबद्दल मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी आणि बंडोल पोलीस ठाण्यातील 10 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
सिवनीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा पांडे, बंडोल पोलीस ठाण्याचे प्रभारी उपनिरीक्षक अर्पित भैरम, सिवनी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील प्रधान आरक्षक माखन, रीडर रवींद्र उईके, आरक्षक जगदीश यादव, योगेंद्र चौरसिया, चालक रितेश, आरक्षक नीरज राजपूत, आरक्षक (गनमॅन) केदार, आरक्षक सदाफळ अशी निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व पोलिसांची नावे आहेत. या कारवाईमुळे मध्य प्रदेश पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, 8 ऑक्टोबरला रात्री उशिरा नाकाबंदीमध्ये पोलीस वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी कटनीवरून नागपूर मार्गे जालन्याला निघालेल्या एका कारमध्ये 3 कोटी रुपये आढळून आले. ही रक्कम पोलिसांनी वाटून घेतली होती. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पांडे यांना माहिती देण्यात आली. पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्या दिवशी नागपुरातील काही व्यक्तींनी तक्रार देण्यासाठी थेट सिवनी गाठले. त्यावेळी प्रसारमाध्यमांमध्ये प्रकरण उजेडात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.