काही दिवसांपूर्वी Gen Z आंदोलकांनी नेपाळमधील सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर जगातील अनेक देशातील तरूणाई रस्त्यावर उतरली होती. अशातच आता आफ्रिकेच्या पूर्व भागातील देश मादागास्करमध्येही Gen Z आंदोलकांनी सरकार उलथवून टाकले आहे. येथे गेले काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यानंतर आता राष्ट्रीय सभेच्या महाभियोग प्रस्तावानंतर सरकार बरखास्त करण्यात आले आहे. त्यानंतर राष्ट्रपती अँड्री राजोएलिना हे देश सोडून पळून गेले आहेत. आता हा देश लष्कराच्या ताब्यात गेला आहे.
सरकार बरखास्त झाल्यानंतर एलिट कॅपसॅट युनिटचे कमांडर कर्नल मिशेल रँड्रियानिरिना यांनी लष्कराने सत्ता ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. आता आगामी काळात लष्कर आणि जेंडरमेरी अधिकाऱ्यांची परिषद सरकार स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नियुक्त करणार आहे. त्यामुळे आता मादागास्करला नवे सरकार मिळणार आहे.
महाभियोग टाळण्याचा झाला होता प्रयत्न
राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांनी महाभियोगाची कारवाई रोखण्यासाठी एक अध्यादेश काढत राष्ट्रीय सभा बरखास्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न फसला. त्यामुळे महाभियोग प्रस्तावानंतर सरकार बरखास्त झाले. या घटनेच्या काही तासांनंतर राजोएलिना हे फ्रेंच लष्करी विमानाने मादागास्कर सोडून पळून गेले. जीवाला धोका असल्याने ते सुरक्षित ठिकाणी गेले असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
Gen Z आंदोलनाला यश
मादागास्करमध्ये तब्बल 3 आठवड्यांपासून Gen Z आंदोलक आंदोलन करत होते. अनियमित पाणी आणि वीज पुरवठ्यामुळे हे आंदोलन सुरु झाले होते. कालांतराने भ्रष्टाचार, प्रशासनातील अनियमितता आणि गरिबीकडे सरकार करत असलेले दुर्लक्ष हे मुद्देही समोर आले आणि संपूर्ण देशातील तरुणाई रस्त्यावर उतरली. आंदोलक जपानी अॅनिमे वन पीस आणि मालागासी तिरंग्याचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले होते.कालांतराने Gen Z च्या या आंदोलनाला लष्कराचाही पाठिंबा मिळाला. 2009 मध्ये याच लष्कराने राजोएलिना यांना सत्तेवर आणले होते, मात्र आता लष्करानेच त्यांना पायउतार केले आहे. पोलीस आणि इतर निमलष्करी दलांनीही सरकारची बाजू घेण्यास नकार दिला होता. त्यामुळेच हे Gen Z आंदोलन यशस्वी झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.