Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

न्यायाधीशाच्या पत्नीचा चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमध्ये मृत्यू; मोबाईल ट्रेस करून ट्रेन रोखली, मग...

न्यायाधीशाच्या पत्नीचा चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमध्ये मृत्यू; मोबाईल ट्रेस करून ट्रेन रोखली, मग...


रतलाम:  मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमध्ये एका न्यायाधीशाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. पत्नीची वाट पाहत स्टेशनवर थांबलेल्या पतीला त्यांची पत्नी ट्रेनमध्ये मृत्यूशी संघर्ष करतेय हे माहितीही नव्हते.

कांचीगुडा-भगतच्या कोठी एक्सप्रेसमधील हा प्रकार आहे. जिथे प्रवासावेळी अचानक महिलेची तब्येत बिघडली आणि सायलेंट हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला. या घटनेची रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन चौकशी करत आहे.

माहितीनुसार, राजस्थानच्या निंबाहेडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजकुमार चौहान पत्नी उषा चौहान यांच्यासह जोधपूरहून निंबाहेडा येथे परतत होते. हे दोघेही ट्रेनमध्ये चढले परंतु त्यांची जागा वेगवेगळ्या कोचमध्ये होती. त्यामुळे हा प्रवास दोघांनी वेगवेगळ्या डब्यातून केला. प्रवास सुरू होता. वाटेत दोघांचे फोनवरून बोलणेही झाले. निंबाहेडा स्टेशनला पोहचण्यापूर्वी उषा चौहान यांनी पतीला फोन केला आणि वॉशरूमला जातेय असं सांगितले. मात्र या फोनवरील संवाद अखेरचा ठरेल हे कुणालाही वाटले नसेल.

पती स्टेशनवर वाट पाहत बसले, मग...
काही वेळानंतर ट्रेन निंबाहेडा स्टेशनला पोहचली. ट्रेन थांबल्यानंतर न्यायाधीश राजकुमार चौहान डब्यातून खाली उतरून पत्नीची वाट पाहू लागले. पत्नीही कोचमधून खाली उतरून प्लॅटफॉर्मवर येईल अशी अपेक्षा त्यांना होती. परंतु काही मिनिटे वाट पाहूनही पत्नी उषा दिसली नाही. कदाचित ती दुसऱ्या दरवाजाने उतरली असेल किंवा सामान घेण्यास उशीर होत असावा असं त्यांना वाटत राहिले. मात्र जेव्हा खूप वेळ झाला आणि पत्नी दिसत नव्हती तेव्हा त्यांची चिंता वाढली. राजकुमार यांनी पत्नीला शोधण्याचा प्रयत्न केला. प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांनाही विचारले तरीही कुणाकडे काही माहिती मिळाली नाही. ट्रेन रवाना झाली, पत्नी अचानक बेपत्ता झाल्याने तातडीने जजने रेल्वे पोलिसांना सूचना केली. सूचना मिळताच पोलिस सक्रीय झाले. त्यांनी माहिती गोळा करत पुढील स्टेशनला अलर्ट केले.

ही ट्रेन मंदसौर स्टेशनला थांबवून तपास करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे पोलीस आणि कर्मचारी ट्रेनमधील डब्यांची चौकशी करत होते. तिथेही उषा चौहान यांचा शोध लागला नाही. त्यामुळे पोलिसांनी महिलेचे मोबाईल लोकेशन ट्रेस केले. हे लोकेशन ट्रेनमध्येच होते. त्याआधारे पोलिसांनी जावरा स्टेशनला ट्रेन पुन्हा थांबवली. तिथे उषा चौहान प्रवास करत असलेल्या आरक्षित डब्यात तपास सुरू केला. त्यावेळी टॉयलेटचा दरवाजा बंद असल्याचे निदर्शनास आले. खूप वेळ दरवाजा ठोकूनही आतून काही प्रतिसाद आला नाही त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. दरवाजा तोडून आतील दृश्य पाहताच पोलिसांना धक्का बसला. उषा चौहान बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्राथमिक अंदाजानुसार या महिलेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे सांगण्यात येत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.