राज्यातील पॅथोलॉजी लॅबसाठी नवीन कायदा - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
मुंबई : राज्यातील आरोग्य सेवांची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळांसाठी (पॅथोलॉजी लॅब) चाचण्यांमध्ये अचूकता आणण्यासाठी तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांची शैक्षणिक पात्रता सुनिश्चित करण्यासाठी लवकरच स्वतंत्र कायदा आणला जाणार आहे. तो कायदा यंदाच्या अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता असून गावपातळीवरील छोट्या प्रयोगशाळांपासून ते महानगरांतील मोठ्या रुग्णालयांतील अत्याधुनिक प्रयोगाळांपर्यंत सर्वांचाच समावेश असेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषदेत शिंदे सेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे राज्यातील पॅथोलॉजी लॅबची गुणवत्ता, तपासण्यांची अचूकता आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री आबिटकर म्हणाले की, आरोग्य सेवा प्रभावी होण्यासाठी अचूक निदान अत्यावश्यक आहे. प्रयोगाळांतील तपासण्या दर्जेदार आणि विश्वासार्ह असतील तरच रुग्णांना योग्य उपचार देता येतील. राज्यातील गावपातळीपासून ते मोठ्या शहरांतील रुग्णालयांपर्यंत सर्व रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळांचे नियमन, नोंदणी व निरीक्षण करण्यासाठी स्पष्ट आणि सर्वसमावेशक कायद्याची आवश्यकता आहे.सध्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातील अधिकारविभागणीबाबत स्पष्टता आवश्यक असून, त्यासाठी सुसंगत कायदा करण्यात येणार आहे, असे आबिटकर यांनी स्पष्ट केले. या प्रस्तावित कायद्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञांची शैक्षणिक गुणवत्ता, उपकरणांची प्रमाणितता, तपासण्यांची अचूकता, तसेच नियमित तपासणी व देखरेख यांसंबंधी तरतुदी करण्यात येतील. कायदा तयार करताना सर्व लोकप्रतिनिधी, संबंधित तज्ज्ञ व घटकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील, असेही आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
