सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघातापूर्वीचा व्हिडीओ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे, प्रत्यक्षदर्शींचीही पोलिसांकडून चौकशी
कुन्नूर: तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातापूर्वीचा व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता.
लग्न समारंभांचे फोटो आणि व्हिडिओ काढणारा कोईम्बतूरचा रहिवासी जोए, हा 8 डिसेंबर रोजी डोंगराळ निलगिरी जिल्ह्यातील कट्टेरी भागात आपला मित्र नाझर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो काढण्यासाठी गेला होता. विशेष बाब म्हणजे, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी त्याने हेलिकॉप्टरचा व्हिडिओ आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केला होता.
धुक्यात हेलिकॉप्टर गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून जिल्हा पोलिसांनी जोएचा मोबाईल फोन कोईम्बतूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.
पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोटोग्राफर आणि इतर काहीजण घनदाट जंगलात का गेले होते, जे वन्य प्राण्यांच्या हालचालीमुळे प्रतिबंधित क्षेत्र आहे, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, पोलीस विभागाने चेन्नई हवामान विभागाकडून अपघाताच्या दिवशीचे तापमान आणि हवामानाशी संबंधित माहिती मागवली आहे. या अपघाताबाबत पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करत आहेत.
वरुण सिंग यांची प्रकृती अजूनही गंभीर
कुन्नूरच्या कटेरी-नंजप्पनचत्रम भागात गेल्या बुधवारी एमआय-17 व्हीएच हेलिकॉप्टर कोसळून सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातातून बचावलेले भारतीय हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर बंगळुरूमध्ये उपचार सुरू आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.