महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन दाखल
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या गुरुवारी होणार लोकार्पण :
प्रसवपूर्व महिलांना मिळणार मोफत लाभ :
सांगली आणि मिरजेसाठी प्रत्येकी 1 मशीन
प्रवसवपूर्व मोफत तपासणी होणार
सांगली: महापालिका क्षेत्रातील प्रसवपूर्व महिलांची होणारी गैरसोय लक्षात घेता अशा महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या दोन अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन महापालिका प्रशासनाने खरेदी केल्या असून या अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनचे उद्या 16 डिसेंबर 2021 (गुरुवारी) लोकार्पण केले जाणार आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सांगली आणि मिरज प्रसूतिगृहात हे कार्यक्रम होत आहे. महिला बालकल्याण समितीच्या निधीमधून या अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रसवपूर्व महिलांसाठी अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनुसार महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. गीतांजली ढोपे पाटील आणि सर्व सदस्यांनी या सोनोग्राफी मशीनसाठी २३ लाख ६० हजाराचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार महापालिकेच्या आरोग्य ताफ्यात दोन अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन दाखल झाली आहे. या मशीन कलर डॉकलर अल्ट्रासाउंड असून यामध्ये फोर डी स्कॅनची सोय आहे. या सोनोग्राफी मशीन सांगली प्रसूतिगृह आणि मिरज प्रसूतिगृह या ठिकाणी बसवण्यात आल्या असून मनपा क्षेत्रातील प्रसवपूर्व तपासणीसाठी येणाऱ्या महिलांसाठी या ठिकाणी मोफतपणे सोनोग्राफीची सेवा दिली जाणार आहे. सांगली प्रसूतिगृहात डॉ सुचेता पवार तर मिरज प्रसूतिगृहात डॉ. सुमन अनिघोळ या कामकाज पाहणार आहेत.
गुरुवारी दुपारी ३ वाजता मिरज प्रसूतिगृह येथे तर ४ वाजता सांगली प्रसूतिगृह येथे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण केले जाणार आहे. यावेळी उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, महिला बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील, अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, गटनेते विनायक सिंहासने, विरोधीपक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान , उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांच्यासह मनपाचे सन्मानीय सदस्य उपस्थित राहणार आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.