मिळकतीवरील सत्ता 'इ' प्रकार ची नोंद कमी होण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार पृथ्वीराज पाटील यांची महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा
सांगली, दि. २० : सांगली शहरामधील रेकॉर्डवरील/मिळकत पत्रिकेवरील सत्ता 'इ' प्रकार ची नोंद तातडीने कमी करून मिळावी, अशी मागणी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांची नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुंबईत भेट घेऊन केली. ना. थोरात यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे लवकरच मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे, असे श्री. पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
ना. थोरात यांनी यावेळी सांगितले की, पृथ्वीराज पाटील यांनी या विषयावर सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा केला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेऊ आणि सत्ता 'इ' मधून व्यापारी नागरिकांच्या मिळकती मुक्त करू.
महसूलमंत्री ना. थोरात यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सांगली शहरामधील वखारभाग, टिंबर एरिया, गावभागातील काही भाग, ओव्हरसीर कॉलनी अशा सुमारे ३५ हजार नागरिकांच्या अंदाजे ७५० जागा मिळकती पत्रावर/रेकॉर्डवर सत्ता 'इ' प्रकार ची नोंद असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे या मिळकती सरकारच्या आहेत, असे समजून सन २०१६ मध्ये नगर-भूमापन विभाग सांगलीकडून सदर मिळकतीवरचे सर्व व्यवहार, खरेदी-विक्री, वाटणी पत्र, बक्षीसपत्र, बॅंक गहाणखत इ. करिता हे शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही, असे रजिस्ट्रार यांना कळवले आणि त्यावरील सर्व व्यवहार थांबविण्यात आले होते.
यामुळे गेल्या पाच वर्षांत वरील नागरिकांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले होते. सदर सत्ता ‘इ‘ प्रकार याबाबत येथील नागरिकांनी एकत्र येवून सत्ता ‘इ‘ प्रकारची नोंद कमी करणेकरीता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत रितसर शासनाकडे पत्रव्यवहार केला. याबाबत शासनस्तरावर संबंधित सर्व विभागांचे अभिप्राय घेवून तशा प्रकारचा प्रस्ताव आपल्या कार्यालयाकडे अंतिम निर्णयाकरीता विचाराधिन असल्याचे समजते. मागील पाच वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून वरील नागरिकांच्या मिळकतीवरील सत्ता ‘इ‘ प्रकारची नोंद कमी करून त्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यासाठी रेकॉडवरील/मिळकत पत्रिकेवरील सत्ता 'इ' प्रकार ची नोंद कमी करण्यास मान्यता देवून तसा शासन निर्णय व्हावा, असेही या निवेदनात म्हटले आहे.
ना. थोरात यांच्याशी यशस्वी चर्चा घडवून आणल्याबद्दल व्यापारी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने पृथ्वीराज पाटील यांचे आभार व्यक्त केले.
शिष्टमंडळात सनतकुमार कत्ते, अमित खोकले, ॲड. अभिनंदन शेटे, श्री. गुमास्ते, राहुल आरवाडे, प्रितेश कोठारी, डॉ. सी. डी. देसाई, केदार मगदूम, सैफ मुजावर, रवींद्र खराडे, डॉ. केतकी जठार यांचा समावेश होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.