Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं; ते मराठा म्हणून मैदानात उतरले- इम्तियाज जलील

 मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं; ते मराठा म्हणून मैदानात उतरले- इम्तियाज जलील


मुंबई: वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ही औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

तसेच हिमंत असेल तर राज्य सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या घोटाळ्याप्रकरणी चौकशी लावावी, असं थेट आव्हान देखील इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. आरक्षणासाठी एमआयएमकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक या रॅलीमध्ये मुंबईतील चांदिवली भागात दाखल झाले आहेत. त्यावेळी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधाला आहे.

मी मुंबईत येऊ नये म्हणून पूर्ण ताकद लावली. रॅली दरम्यान पोलिसांनी अनेकदा अडवलं. औरंगाबाद, अहमदनगर, पुणे पुढे नाही जाऊ देणार, असं सांगितलं गेलं. पण आम्ही मुंबईत आलोच, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं. तसेच मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांचे आभार, कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं. ते फक्त आदेश मानत होते, असं देखील इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

इम्तियाज जलील यांनी मराठी समाजाचे देखील कौतुक केले आहे. मराठा बांधवांकडून खूप शिकण्यासारखं आहे. आरक्षणासाठी काढलेल्या रॅलीमध्ये ते फक्त मराठा म्हणून उतरले. ते कोणत्याही पक्षाचे नव्हते. त्यात ना शिवसेना, भाजप, काँग्रेस ना राष्ट्रवादी काँग्रेस या कोणत्याच पक्षाचे लोक नव्हते. ते फक्त मराठा म्हणून मैदानात उतरले होते. त्यामुळे मराठा बांधवांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्यालाही तसेच मैदानात उतरावे लागेल, असं देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले.

रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक- इम्तियाज जलील

रॅलीबाबत खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत रॅली, मोर्चांना बंदी घातल्याचं ऐकलं. रॅली, मोर्चाना बंदी घालणे हा एक जोक आहे. सरकार आणि ओमायक्रॉन व्हायरसची काही बोलणी झाली आहे. 11 आणि 12 तारखेला फक्त ओमायक्रॉन येणार आहे. नंतर आम्ही इथून गेलो की तो पुन्हा येईल, असा टोला जलील यांनी लगावला.

आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार- इम्तियाज जलील

काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात असताना मुस्लिम आरक्षणाची मागणी करत होते मात्र आता ते सरकारमध्ये बसून गप्प आहेत. आम्ही आगामी निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर लढवू, असंही ते म्हणाले. आम्ही डेटासह मुस्लिम समाजावर अन्याय झाल्याचं दाखवून देणार आहोत, असंही ते म्हणाले. रॅलीला परवानगी घेतलेली आहे. त्यानंतर यावर निर्बंधाबाबत आमच्याकडे काहीही अधिकृत पत्र आलेलं नाही, असं जलील म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.