बारावी विज्ञान शाखेमध्ये व पदवीका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज 31 मार्च पर्यंत सादर करण्याचे आवाहन
सांगली दि. 10 : सन 2021-22 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदवीका (डिप्लोमा) तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज समितीकडे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारशीसह दि. 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य यांनी केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Civil Appeal No १९२६४/२०१७) मध्ये दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता उमेदवारास अर्ज करतेवेळीस जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे अत्यावश्यक आहे. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थी पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे मुदतीत सादर करण्याबाबत सूचना निर्गमित कराव्यात, जेणेकरून समितीस प्राप्त अर्जावर मुदतीत नियमानुसार कार्यवाही पूर्ण करून निर्णय / जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करता येईल. तथापी बहुतांश विद्यार्थी १२ वी परीक्षा झाल्यानंतर / पदवीका अभ्यासक्रमांचे विद्यार्थी तृतीय वर्षाची परीक्षा झाल्यानंतर/ निकाल लागल्यानंतर किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अंतिम क्षणी समितीकडे प्रस्ताव सादर करतात. अशा प्रकरणी समिती निर्णय होण्यास अवधी लागू शकतो व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.
वैधता प्रमाणपत्राकरिता अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा व तो ऑफलाईन समितीस सादर करावा. अर्जदारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होणार असल्याने अर्जदाराने स्वतःचे / पालकांचे अचूक ई-मेल नमुद करण्याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग यांचे जातीचे प्रमाणपत्र देणे व पडताळणी करणे अधिनियम २००० चे कलम ८ अन्वये जातीचा दावा सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदार यांची आहे. अर्ज अपूर्ण आढळल्यास तशी कारणे नमूद करून जातीचे प्रमाणपत्र देण्याचा व त्याच्या पडताळणीचे विनियमन, नियम २०१२ मधील कलम १७ (२) व १७ (३) अन्वये निकाली काढली जातील.
अर्जदारांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर ने केल्यामुळे समितीस अर्जावर मुदतीत प्रक्रिया पूर्ण करून वैधता प्रमाणपत्र/ समिती निर्णय देणे अशक्य झाल्यास व त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास अथवा त्रुटी असलेली प्रकरणे निकाली न निघल्यास व त्यामुळे अर्जदारास प्रवेशापासून वंचित रहावे लागल्यास यास समिती जबाबदार राहणार नाही. त्यामुळे समितीकडे वेळेत म्हणजे दि ३१ मार्च २०२२ पूर्वी अर्ज सादर करण्याची दक्षता घ्यावी. शैक्षणिक संस्था व्यवस्थापनाने आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या/ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याच्या निदर्शनास वरील बाबी आणाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.