आपल्या कीर्तनाच्या क्लिप यूट्यूबवर अपलोड करणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील; इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य
अकोला: आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप बनवून यूट्यूबवर अपलोड करुन चार हजार लोक कोट्यधीश झालेत, त्यांच्यामुळेच आपण अडचणीत आलो असून अशांची मुलं दिव्यांग जन्माला येतील असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं आहे.
अकोला शहरातील कौलखेड भागात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केलं होतंय. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्यं केलं. इंदुरीकर महाराज म्हणाले की, "आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. " आपल्या कीर्तनातून यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांवर घसरणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी या आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. अपत्य जन्माच्या बाबतील त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते त्यांच्या अंगलट आलं होतं.
काय म्हणाले होते निवृत्ती महाराज इंदुरीकर?
स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्षपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला, असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात म्हटलं होतं.
इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता न्यायालयानं इंदुरीकरांना दिलासा दिला असून त्यांच्या विरोधातील खटला रद्द करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.