सेवा पंधरवड्यात नागरिकांच्या प्रलंबित अर्जाचा निपटारा करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. 16, : सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरीता राज्य शासनाने सन 2015 मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले आहे. त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्रलंबित संदर्भ, अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्यासाठी दि. 17 सप्टेंबर 2022 ते दि. 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा राबविण्याचे शासनाने निश्चित केले आहे. सेवा पंधरवड्यात विविध संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरूपात निपटारा करणे अपेक्षित आहे. तरी सर्व संबंधित विभागांनी त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा संदर्भात नागरिकांच्या प्रलंबित अर्जांचा निपटारा सेवा पंधरवड्यात करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.
सेवा पंधरवड्यामध्ये सेवा विषयी प्रलंबित कामाचा विहित कालमर्यादेत निपटारा करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्याीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सेवा पंधरवड्यात आपले सरकार वेबपोर्टलवरील 392 सेवा, महावितरण पोर्टलवरील 24 सेवा, डी.बी.टी. पोर्टलवरील 46 सेवा, नागरी सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या शासकीय सेवा, विभागांच्या स्वत:च्या योजनांशी संबंधित पोर्टलवरील प्रलंबित अर्ज, या व्यतिरिक्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्योची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून), दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल, ग्रामविकास, नगरविकास, कृषी, आदिवासी विकास, सार्वजनिक आरोग्य व ऊर्जा विभाग तसेच सर्व शासकीय विभागांकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेत निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चीत करून अंमलबजावणीकरीता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून द्यावी व सेवा पंधरवड्याच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता योग्य नियोजन करावे. प्रत्येक शासकीय विभागाने सेवा पंधरवडा कालावधीत केलेल्या कामकाजाविषयीचा प्रमाणपत्रासह अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.