पुण्यात अजितदादांचे मोठे विधान
पुणे: सार्वजनिक व्यवस्थेसाठी सुविधा निर्माण करताना पुढील पिढीचे हित लक्षात घेऊन प्रदूषण होणार नाही, वसुंधरेचे संवर्धन व्हावे, या सर्वांचा विचार करून समतोल साधायला पाहिजे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वेळ, इंधन, श्रम वाया जात आहे. त्यामुळे काळाजी गरज असेल, तर रस्ता केला पाहिजे, असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे वेताळ टेकडीवरून होणाऱ्या रस्त्याला सहमती दर्शविली आहे. सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
पुण्यात आले असता पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बालभारती ते पौड रस्ता हा वेताळ टेकडीवरून करण्याचे प्रस्तावित आहे. या रस्त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. त्यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येमुळे वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. सार्वजनिक पायाभूत सुविधेसाठी मेट्रो, बोगदा, रस्ते असे प्रकल्प हाती घ्यावे लागतात. हे प्रकल्प करताना पर्यावरणपण जपले पाहिजे. त्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करताना रहदारी कमी करण्याच्या दृष्टीने जे करणे शक्य असेल, त्याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांबरोबरच बाहेरून येणाऱ्या नागरिकांनीसुद्धा आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
तर कोरोनाच्या वाढती संख्येबद्दल बोलताना पवार म्हणाले, कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, परंतु सरकार गांभीर्याने घेत नाही. किमान सरकारी कार्यालयांच्या पातळीवर तरी मास्क बंधनकारक केला पाहिजे, मात्र अद्यापही तसे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आलेले नाही. रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम लवकर झाले पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता आहे. शहराबाहेरून येणारी आणि शहराबाहेर जाणारी ही वाहने विनाकारण शहरात येतात. ती बाहेरच्या बाहेर जातील. त्यातून शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल. मेट्रो प्रकल्पाचे कामही गतीने झाले पाहिजे. या प्रकल्पांची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांनी दर आठवड्याला आढावा बैठक घेऊन या कामांना गती दिली पाहिजे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
