मोदानी हटाओ, लोकशाही बचाओ
मोदानी हटाओ, लोकशाही बचाओ, देश बचाओसाठी काँग्रेसचे सांगलीत जोरदार पोस्टकार्ड आंदोलन
सांगली: "मोदांनी हटाओ, लोकशाही बचाओ, देश बचाओ" यासाठी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व सर्व फ्रंटलसच्यावतीने मारुती चौकातील पोस्ट ऑफिस समोर पोस्ट कार्ड मोहीम आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी केले. आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पंतप्रधान मोदी यांना पत्रे पाठवली. आंदोलनात बोलताना श्री. पृथ्वीराज पाटील म्हणाले, या देशात अनेक मोठे घोटाळे झाले आहेत परंतु ते करणारे मोकाट सुटले आहेत, त्यांच्यावर मोदी सरकार कारवाई का करत नाही? वाढलेली प्रचंड महागाई कधी कमी करणार आहात?
पंतप्रधान श्री. मोदी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण २०१४ च्या निवडणुकीआधी आणि नंतरही विविध आश्वासने दिली, पण त्याची पुर्तता केली नाही. त्याचबरोबर देशात रोज मोठे घोटाळे होत असून हे घोटाळेबाज मोकाट आहेत. आपण दिलेल्या आश्वासनांची पुर्तता तर करावीच, पण घोटाळ्यांना चाप लावून घोटाळे केलेल्यांना कडक शासन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, परंतु आपण ना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करत आहात, ना घोटाळेबाजांना शासन करताना दिसत आहात.
खालील प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांनी तात्काळ द्यावीत, अशी विचारणा या पत्राद्वारे केली आहे. यामध्ये अदानींच्या आर्थिक भानगडींची आपण जेपीसी मार्फत चौकशी कधी पासून सुरू करणार आहात? केंद्र सरकार जेपीसी चौकशीपासून पळ का काढत आहे? एसबीआय आणि एल आय सी ला अदानींच्या आर्थिक भानगडींमुळे जो धोका निर्माण झाला आहे, त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण काय उपाययोजना केली आहे? निरव मोदी, ललित मोदी, मेहुल चौक्सी, विजय मल्ल्या यांना पकडून देशातील न्यायव्यवस्थेसमोर केव्हा हजर करणार आहात? अच्छे दिन गौतम व विनोद अदानी यांना आले आहेत, सामान्य माणसांना अच्छे दिन कधी येणार? स्वीस बॅंकातील कथित काळा पैसा प्रति नागरीक १५ लाख रूपये याप्रमाणे वाटणार होतात त्याचे काय झाले? इडी, सेबी, सीबीआय इत्यादी तपास यंत्रणा अदानींची निःपक्षपातीपणे चौकशी सुरू करतील का? महागाई कमी कधी होणार?वर्षाला २ कोटी रोजगार देणार असे म्हणालात, सबब आपण त्याप्रमाणे वार्षिक २ कोटी रोजगार कधीपासून देणार आहात? १०० स्मार्ट सिटी बनवणार होता. गेल्या ९ वर्षांत किती स्मार्ट सिटी तयार केल्या? शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कधी होणार? चिन देशातल्या विविध भूभागावर वारंवार घुसखोरी करत आहे, अरूणाचल प्रदेश सारख्या राज्यातील गावांची नावे चिनी भाषेत ठेवत आहेत, त्यास आपण चोख उत्तर का देत नाही? चिनला लाल डोळे कधी दाखविणार आहात? २०२२ पर्यंत सर्वांना घरे देणार होतात, २०२३ आले तरी सर्वांना घर मिळालेली नाहीत, यांबद्दल जनतेची माफी मागून सर्वांना घर मिळावे म्हणून आपण काय करणार आहात? आपल्या पक्षाचे नेते आपण नेमलेले विविध राज्यपाल हे वारंवार महाराष्ट्रातून महान व्यक्तिंवर शिंतोडे उडवत आहेत, त्यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करत आहेत, त्यास आपण कधी आणि कशाप्रकारे चाप लावणार आहात? महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवस्मारकाचा आपणास विसर पडला आहे काय? महाराष्ट्राला वेदांता, फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प कधी मिळणार? पिकविम्याच्या नावाखाली खाजगी विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट कधी थांबणार? मध्यमवर्गीयांना गॅस सिलेंडर, पेट्रोल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करून 'अच्छे दिन' कधी दाखवणार? लोकशाहीनियुक्त सरकारे हुकूमशाहीच्या बळावर पाडण्याचे सत्र कधी थांबणार? धार्मिक उन्मादाला आपल्या सरकारचा पाठिंबा मिळण्याचे कधी थांबणार?भाजप नेत्यांकडून महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वारंवार होणारा अवमान कधी थांबणार? महाराष्ट्रातील मागास, वंचित आणि अल्पसंख्यांकांच्या उच्चशिक्षणासाठी महाराष्ट्रात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना कधी होणार? जीएसटीमार्फत केंद्रसरकारला सर्वात जास्त महसूल देणाऱ्या महाराष्ट्रासोबत केंद्र सरकारचा दुजाभाव कधी थांबणार? कांदा, कापूस, सोयाबीन यांसारख्या पिकांना किमान हमी भाव कधी मिळणार? मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी असलेल्या केंद्र सरकारच्या फेलोशिप (राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप व मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप) पुन्हा कधी सुरू करणार आहात? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले राजर्षि शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत कधी करणार? नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांना न्याय कधी मिळणार? अशा प्रश्नांची विचारणा केली आहे. आपले सरकार हे देशातील सामान्य माणूस, शेतकरी, कामगार, सैनिक, शिक्षण क्षेत्र, उद्योजक व्यापारी व नोकरदार यांच्या विरोधी काम करणारे आहे, त्यामुळे आपण जनतेचा विश्वास गमावला आहे.
या आंदोलनात महापालिका विरोधी पक्ष नेता संजय मेंढे, आशिष कोरी, सनी धोतरे, बिपीन कदम, देशभूषण पाटील, आशा पाटील, सुवर्णा पाटील, नंदा कोलप, बाबगोंडा पाटील, अजित दोरकर, आयुब निशानदार, अमित पारेकर, अरविंद पाटील, नाना घोरपडे, महावीर पाटील, मनोज पवार, नामदेव चव्हाण, संजय मेथे, प्रशांत अहिवळे, राजेंद्र कांबळे, अनिल पवार, सुभाष यादव, मंदार काटकर, अल्बर्ट सावर्डेकर, विश्वास यादव, पैगंबर शेख, मौलाली वंटमुरे, योगेश जाधव, आशिष चौधरी आदि सहभागी होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.