वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोराचा गोळीबार दाेघेजण जखमी .....!
दिल्ली: राजधानी दिल्लीमधील साकेत कोर्टामध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोराने महिला साक्षीदारावर धाडधाड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात महिलेसह आणखी एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोर्ट परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे.
फ्रेंड्स कॉलनीशी संबंधित एका खटल्यात साक्ष देण्यासाठी ही महिला आली होती. त्याचवेळी वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोराने सर्वांसमक्ष तिच्यावर गोळीबार केला. हल्लेखोर आधीच दबा धरून बसला होता. ज्यावेळी ही साक्षीदार असलेली महिला कोर्टाच्या आवारात आली, त्यावेळी तिच्यावर गोळीबार करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.गोळीबारामध्ये महिला साक्षीदार आणि एक वकील जखमी झाला आहे. एम. राधा असे महिलेचे नाव असून तिच्या पोटाला दोन आणि एक गोळी हाताला लागली आहे. तिला साकेतमधील मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डीसीपी चंदन चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.हल्लेखोरांनी महिलेवर चार गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे. या घटनेची दखल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही घेतली असून ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था कोलमडली असून गलिच्छ राजकारण करण्यापेक्षा यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.
दरम्यान, दिल्लीक कोर्टाच्या आवारात गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी 24 सप्टेंबर 2021 रोजी वकिलाच्या वेशात आलेल्या दोन सशस्त्र हल्लेखोरांनी रोहिणी कोर्टात गोळीबार करत गँगस्टर जितेंद्र मान उर्फगोगीची हत्या केली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत राहुल त्यागी आणि जगदीप जग्गा हे दोन्ही बंदूकधारी हल्लेखोर जागीच ठार झाले. तत्पूर्वी एप्रिल महिन्यात रोहणी कोर्टात दोन वकील आणि त्याच्या एका अशीलाला मारहाण झाली होती. त्यानंतर गोळीबारही झाला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.