कर्नाटकात भाजपाला धक्का, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये प्रवेश
बंगळुरु: नाराज होऊन भाजपा सोडलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर सोमवारी काँग्रेसमध्ये दाखल झाले. सोमवारी सकाळी ते बंगळुरुच्या काँग्रेस कार्यालयात दाखल झाले आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत ते पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी राज्यातील डी के शिवकुमार यांच्यासह बडे नेते उपस्थित होते. रविवारी शेट्टर यांनी काँग्रेस नेते रणजदीप सिंह सुरजेवाला आणि सिद्धारामय्या यांची भेट घेतली होती. शेट्टर हे हुबळी-धारवाड मतदारसंघातील आमदार आहेत. या मतदारसंघातून ते भाजपाकडून तिकिटाची मागणी करीत होते.
कर्नाटकची जनता माफ करणार नाही- येडियुरप्पा
जगदीश शेट्टर यांना भाजपानं मोठी पडं दिली. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, प्रदेश अध्यक्ष केलं. त्यानंतरही त्यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये जाणं हे वाईट आहे, असं येडियुरप्पा म्हणालेत. शेट्टर यांची ओळख भाजपामुळेच आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असा टोलाही त्यांनी लगावला. कर्नाटकातील जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिलाय. जगदीश शेट्टर यांना कॅबिनेट पदाची ऑफर देण्यात आली होती. धर्मेंद्र प्रधान यांनी ती दिली होती. तसचं त्यांच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तिकिट देण्याची तयारीही भाजपानं दर्शवली होती. मात्र शेट्टर यांनी याबाबत उत्तर दिलं नाही, असंही येडियुरप्पा यांनी सांगितलंय. शेट्टर काँग्रेसमध्ये सामील का होतायेत, असा प्रश्न येडियुरप्पांनी त्यांना विचारला आहे.
शनिवारी रात्री दिला होता भाजपाचा राजीनामा
शनिवारी शेट्टर यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तर रविवावी आमदारकीचा राजीनामा दिला होता. हुबळीतून तिकिट मिळत नसल्यानं शेट्टर नाराज होते. शनिवारी शेट्टर यांनी पक्षश्रेष्ठींना आव्हानही दिलं होतं. आपल्या तिकिटाबाबत निर्णय घ्यावा, अथवा त्यांच्या २० ते २५ जागांचं नुकसान करु असा इशारा त्यांनी दिला होता.
निवडणुका लढणार - शेट्टर
भाजपात आपल्याला अपमानित करण्यात आलं, त्यामुळं निराश झाल्याचं शेट्टर म्हणाले आहेत. आपल्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या अपमानाला आव्हान देण्यासाठी विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं शेट्टर म्हणालेत. तिकिट मिळालं नसल्यानं नाराज असलेल्या शेट्टर यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली होती. मात्र तरीही त्यांना तिकिट मिळालं नव्हतं. शेट्टर यांनी पक्ष सोडण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी त्यांच्या जाण्यानं पक्षाचं नकसान होईल, असं वक्तव्य केलं होतं. शेट्टर यांना तिकिट मिळालं नाही, तर त्याचा परिणाम एका जागेवर नाही तर २५ जागांवर होईल, असं ते म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
