उद्धव ठाकरे जेव्हा बोलू लागतात तेव्हा शिंदे-फडणवीस यांच्या पोटात गोळा येतो - संजय राऊत
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस आहे. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु वाढदिवसानिमित्त आवाज कुणाचा या पॉडकास्टसाठी त्यांनी मुलाखत दिली आहे. त्यांची ही मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी सकाळी 08 वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले, “विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा धसका घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या बोलण्यात काहीतरी असावं, म्हणूनच विरोधक आतापासूनच टीका करत आहे. 26 आणि 27 जुलै रोजी दोन भागात उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रक्षेपित होणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे देशातील पहिले असे नेते असतील ज्यांच्या मुलाखतीची चर्चा मुलाखत प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच सुरू आहे.” पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला संपवलं, हे जे लोकं सांगतात त्यांच्या पोटात उद्धव ठाकरे बोलू लागतात तेव्हा गोळा येतो.
देवेंद्र फडणवीस काय बोलतात यापेक्षा महत्त्वाचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे काही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाही. त्याचबरोबर ते विधानसभा अध्यक्ष देखील नाही. “आम्ही जेव्हा म्हणतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाही. तेव्हा आमचं बोट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे असतं.
अपात्रतेसाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेले जे निर्देश आहे. त्याचं विधानसभा अध्यक्षांनी तंतोतंत पालन केलं, तर देवेंद्र फडणवीस जे म्हणतात त्या बोलण्याला काही अर्थ नाही आणि हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहिती आहे”, असही ते यावेळी म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.