कडेगाव तालुक्यातील एका कृषी औषध कंपनीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाचा रिपोर्ट देण्यासाठी 30 हजारांची लाच घेताना सांगली कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकाला 30 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.
संतोष राजाराम चौधरी, (वय 46, रा. फ्लॅट नं.404, गणेशनमन अपार्टमेंट, धामणी रोड सांगली. मुळ रा. गलांडेवाडी नं. 1, ता. इंदापुर, जि. पुणे) असे अटक केलेल्या गुणवत्ता निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी तळेगाव एमआयडीसी येथे शेती औषधाची कंपनी सुरु करणेकामी सन 2023 मध्ये एमआयडीसी कडेगाव सोबत करार केला आहे. एमआयडीसी कडेगाव यांनी दिलेल्या जागेवर तक्रारदारांनी पैरागॉन अग्री केअर या नावाची शेती औषध कंपनी स्थापन करुन त्याचे बांधकाम पूर्ण करुन बिल्डींग कम्प्लीशन सर्टिफिकेट (DRC) मिळणेसाठी खाजगी एजंटामार्फत फाईल तयार करुन घेतली होती.
सदर सर्टिफिकेट प्राप्त करणेकरीता सदर फाईल पुणे येथील ऑफिसमध्ये पाठवावी लागते. तत्पूर्वी जिल्हा कृषी विभाग सांगली यांचेकडून सदर इमारतीचे इन्स्पेक्शन करुन रिपोर्ट प्राप्त करावा लागतो. सदर इन्स्पेक्शन रिपोर्ट मिळणेसाठी यातील तक्रारदार काल बुधवारी रोजी जिल्हा कृषी विभाग सांगली येथे गेले असता निरीक्षक चौधरी यांनी कंपनीच्या इमारतीचा इनस्पेक्शन रिपोर्ट देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 35 हजार रुपये लाचेची मागणी केलेबाबतचा अर्ज तक्रारदार यांनी सांगली एसीबी पथकास दिला होता.
तक्रारी अर्जाचे अनुषंगाने पडताळणी केली असता, चौधरी यांनी तक्रारदारांच्या औषध कंपनीच्या इमारतीचा इनस्पेक्शन रिपोर्ट प्रत्यक्षात इनस्पेक्शन न करता रिपोर्ट देण्याकरीता प्रथम 35 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवार दि. 24 रोजी सापळा रचून चौधरी यांनी त्यांचे कक्षामध्ये तक्रारदार यांचेकडून 30 हजार रूपये लाच रक्कम स्विकारले असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सांगलीचे उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक किशोर कुमार खाडे, निरीक्षक विनायक भिलारे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, उमेश जाधव, सुदर्शन पाटील, सलीम मकानदार, रामहरी वाघमोडे, धनंजय खाडे, सीमा माने, चंद्रकांत जाधव, वीणा जाधव, चालक विठ्ठलसिंग रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.