Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर :- मूल्यमापन समिती आली, महापालिका चकाचक झाली; पायऱ्या चढताना समिती सदस्यांची दमछाक

कोल्हापूर :- मूल्यमापन समिती आली, महापालिका चकाचक झाली; पायऱ्या चढताना समिती सदस्यांची दमछाक
 

कोल्हापूर : शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेच्या मूल्यमापनासाठी आलेल्या भारतीय गुणवत्ता परिषद (क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया) या संस्थेच्या समिती सदस्यांची शुक्रवारी महापालिकेत मूल्यमापनाआधीच अक्षरश: दमछाक झाली. प्रशासकांचा कक्ष आणि मिटींग हॉलमध्ये जाण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्या चढताच ते घामाघूम झाले. यातील एक ज्येष्ठ सदस्य पहिल्या मजल्यापर्यंतच्या पायऱ्या चढून थांबले आणि हिंदीमध्ये अजून किती पायऱ्या, असे धापा टाकत टाकतच विचारणा केली.

यावर उपायुक्त पंडित पाटील यांनी हेरिटेज इमारत असल्याने लिफ्ट नाही, पायऱ्याच आहेत, असे सांगून वेळ मारून नेली. दरम्यान, समितीच्या निमित्ताने का असेना चौकातील वाहने, विक्रेत्यांचे स्टॉल गायब झाले होते. दिवसभर अधिकारी ते शिपायांपर्यंत सर्वजण कार्यालयात तळ ठोकून होते. संध्याकाळी साडेपाच वाजता समितीचे सदस्य सुब्रतो बोस, एच. बी. चावला, जयेश यादव हे जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिकेत दाखल झाले. उपायुक्त पाटील यांनी त्यांचे महापालिका चौकातच स्वागत केले. त्यानंतर ते प्रशासकांच्या कक्षाकडे निघाले. अरूंद जिन्यातून ते एकदम खडा पायऱ्या चढू लागले. थोड्या पायऱ्या चढताच ते कासावीस झाल्याचे दिसले. ज्येष्ठ सदस्य थांबत, थांबत कक्षात गेले. प्रचंड उकाडा आणि दोन मजल्यांच्या पायऱ्या चढून त्यांची दमछाक झाली.

दरम्यान, अभ्यागतांना न भेटणारेही दिवसभरात समिती कधीही महापालिकेत येईल म्हणून सर्व विभागांत शिपायांपासून अधिकाऱ्यांपर्यंत खुर्ची सोडली नव्हती. समितीची बैठक कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक वेळ चालली. तरीही कर्मचारी कार्यालयातच थांबून होते. अनेक अधिकारी, कर्मचारी तर कधी एकदा समिती महापालिकेतून बाहेर येईल आणि आम्ही बाहेर पडू, अशा तयारीतच होते.

एका तासात डांबरीकरण..

शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी सहा महिने लागतात. पण समिती येणार, त्यांना बरे वाटले पाहिजे म्हणून शुक्रवारी सकाळी एका तासात महापालिका चौकातील सर्व डांबरीकरण युद्धपातळीवर पूर्ण केले.

चौक वाहनमुक्त
महापालिका चौकात कार्यालयीन वेळेत अधिकारी, अभ्यागतांच्या वाहन पार्किंगमुळे चालण्यासाठी जागा नसते. पण समिती आल्याने चौकातील पार्किंगमध्ये एकही वाहन नव्हते. प्रशासकांचे वाहनही अग्निशमनचे वाहन काढून त्याठिकाणी पार्क करण्यात आले होते. महापालिका इमारतीच्या तिन्ही बाजूला असलेले विक्रेत्यांचे स्टॉल काढण्यात आले होते.
दोरीने बांधून स्वच्छतागृहाचे दार केले बंद

महापालिकेत अभ्यागतांसाठी एका कोपऱ्यात असलेल्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. दुर्गंधीही सुटलेली असते. हे लपवण्यासाठी दिवसभर स्वच्छतागृहाचा दरवाजा दोरीने बांधून बंद केला होता. परिणामी, नैसर्गिक विधी झालेल्यांचा कोंडमारा झाला.

पिचकाऱ्या दिसू नयेत म्हणून कुंड्या
जिन्यावरील अनेक कोपऱ्यांत पान, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारल्या आहेत. याचे डाग पडले आहेत. हे दिसू नये म्हणून पिचकाऱ्या मारलेल्या ठिकाणी झाडाच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. नगरसेवक नसल्याने सभागृह धुळीने माखले होते. ते स्वच्छ करून पंखे, दिवे लावून ठेवण्यात आले होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.