भारतातील कोणत्याही राज्यात गेलात, मग तो शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो. बाजारात खरेदीला जाताना भारतीय ग्राहकांकडे कापडी पिशवी हमखास दिसून येईल. किराणा माल भरायचा असो किंवा शेतीशी
संबंधित सामान आणायचे असो. भारतात मिळणारी जाड कापडाची पिशवी सर्वच राज्याच
प्रसिद्ध आहे. कितीही सामान आणा, कुठेही ठेवा आणि कशीही वापरली तरी धुवून
स्वच्छ करून ही पिशवी पुन्हा पुन्हा वापरता येते. काही जण याला झोळीही
म्हणतात. भारतात जवळपास १०० रुपयांच्या आसपास मिळणारी ही कापडी पिशवी ४०००
रुपयांना विकली जात असेल तर… भारतात ही किंमत ऐकली तर मुर्खात काढले जाईल.
पण अमेरिकेत या किंमतीत अशी पिशवी विकली जात आहे.
अमेरिकेतील नॉर्डस्ट्रॉम नावाच्या एका
डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये 'इंडियन सोव्हेनियर बॅग' या गोंडस नावाने भारतीय
कापडी पिशवी तब्बल ४८ डॉलर्सना (अंदाजे ४,१०० रुपये) विकली जात आहे. जपानी
ब्रँड पुएब्कोने सदर पिशवीचे उत्पादन केले आहे. भारतातील किराणा दुकानात
मिळणाऱ्या पिशव्या प्रमाणेच या कापडी पिशव्यांचे ब्रँडिंग करण्यात आले असून
त्यावर देवनागिरी लिपित विविध दुकानांची नावे प्रिंट करण्यात आली आहेत.
जेणेकरून या पिशव्यांना भारताची जोडले जाईल.
सदर पिशव्यांचे फोटो आणि त्याच्या किमतीविषयीची माहिती सोशल मीडियावर पसरल्यानंतर भारतीय नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. भारतात किराणा किंवा इतर सामान वाहून नेणाऱ्या बहुपयोगी पिशव्या फॅशन म्हणून इतक्या महाग विकल्या जातील, याची कल्पनाही कुणी केली नसेल. सदर प्रकरण हे पाश्चिमात्य रिपॅकेजिंग आणि रिब्रँडिंगचे एक उत्तम उदाहरण असल्याचे काहींचे म्हणणे आहे.सोशल मीडियावर या विषयाचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. भारतात ज्याला झोळी म्हणून फक्त सामानाची ने-आण करण्यासाठी वापरली जाते, ती झोळी जागतिक स्तरावर लक्झरी बॅग म्हणून पुढे आली, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काहींनी भारतीयांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तूचे पाश्चिमात्य जगासाठी महागड्या गोष्टीत रुपांतर केल्याबद्दल संतापही व्यक्त केला.इन्स्टाग्रामवर एक युजरने सदर पिशवीची माहिती देणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर या पिशवीबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण इंटरनेटवर जाऊ लागले. काहींनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटिझन्सने म्हटले की, ४००० रुपयांची पिशवी? माझे देशी मन ही पिशवी विकत घेऊ शकत नाही. दुसऱ्या एका युजरने म्हटले की, माझ्या घरात अशा जवळपास १० पिशव्या आहेत. तर मीही ऑनलाइन दुकान उघडू शकतो का? तिसऱ्या युजरने उपहासाने म्हटले की, हे पाश्चात्य लोक पुढे जाऊन लुंगीही विकतील आणि त्याला स्कॉटिश रॅप म्हणतील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.