Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?



नंदूरबार: लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा...हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सर्वश्रुत आहे. मात्र याचा प्रत्यय हिंगोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ईश्वर ठाकरे यांच्या एका छोट्याशा कृतीने साऱ्यांना आला. सुटीनिमित्त जांभाई इथल्या मूळगावी ते आले असता त्यांनी स्वत: हातात कात्री घेत गावातील लहान मुलांचे केस कापून आपल्या साधेपणाचे दर्शन घडवले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन जांभाई येथील मूळ रहिवासी असलेल्या ईश्वर ठाकरे यांनी २०१५ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी अर्थात न्यायाधीश पदाला गवसणी घातली. सुरुवातीला ठाणे येथे त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर भडगाव आणि आता हिंगोली येथे ते न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याची मातृभूमीशी असणारी नाळ व साधेपणा न सोडणारे अनेक व्यक्तिमत्व बघायला मिळतात. त्याचाच प्रत्यय देणारे न्यायाधीश असणारे ईश्वर ठाकरे हेदेखील एक..


सध्या न्यायालयाला उन्हाळी सुट्या असून सुटीनिमित्त ते गावाला परतले आहेत. जांभाई या आपल्या गावात वास्तव्याला असताना ईश्वर ठाकरे यांना गावातील अनेक लहान मुलांचे केस वाढलेले दिसले. गावात सलूनचे दुकान नसल्याने लहान मुलांची किंवा ज्यांना केस कापायचे असतील त्यांना तळोदा किंवा शेजारच्या गावात जावे लागते. मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना मुलांचे केस वाढल्यानंतर ते शक्य होत नाही. त्यामुळे न्यायाधीश ईश्वर ठाकरे यांनी ही समस्या लक्षात घेऊन मुलांचे केस कापण्याचा निर्णय घेतला.


केस कापण्यासाठी जावे लागते तालुक्याच्या गावी
मजुरीवर उदरनिर्वाह असणाऱ्या अनेक कुटुंबांना मुलांचे नियमित केस कापण्यासाठी तळोदा व इतर ठिकाणी घेऊन जाणे शक्य होत नाही. त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लहान मुलांची वाढलेले केस बघून न्यायाधीश ईश्वर ठाकरे यांनी चक्क स्वत: कात्री आणून लहान मुलांचे केस कापण्यास सुरुवात केली. अगदी साधेपणाने लाकडी ओंडक्यावर बसून त्यांनी लहान मुलांचे केस कापले.
गावी आल्यानंतर समाजोपयोगी उपक्रम

न्यायाधीशपदी निवड झाल्यापासून ईश्वर ठाकरे हे सुट्यांमध्ये आपल्या गावी येतात. गावी आल्यानंतर त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात

आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन

न्यायाधीश ईश्वर ठाकरे हे इतर वेळी सुटीमध्ये ते गावाला येतात तेव्हा त्यांच्यातील न्यायाधीश बाजूला ठेवून अत्यंत साधारण ग्रामीण शैलीचे जीवन ते जगतात. त्यांच्यातील हा साधेपणा अनेकांना प्रभावित करतो. आपल्या आदिवासी समाजातील युवकांनी देखील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांना गवसणी घालावी यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत पुस्तके त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत.

न्यायाधीश असणाऱ्या ईश्वर ठाकरे यांनी आदेश दिले असते तर कुणीही या पोरांचे केस गावात येऊन कापून दिले असते. मात्र तसे न करता ईश्वर ठाकरे यांनी स्वतः आपल्या शालेय जीवनात रमत स्वतःच लहान मुलांचे केस कापून एक नवा आदर्श अनेकांना घालून दिला आहे. ईश्वर ठाकरे यांचे शिक्षण हे आश्रमशाळेत झाले आहे. आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना विद्यार्थी केस वाढले की स्वतः एकमेकांचे केस कापून देतात. या लहान पोरांचे केस कापून देताना आपले शालेय जीवन डोळ्यापुढे उभे राहिले असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आजच्या मॉडर्न आधुनिकीकरणाच्या युगात आपली पारंपरिक संस्कृती विसरत असताना न्यायाधीश ईश्वर ठाकरे यांची आदिवासी ग्रामीण जीवनशैलीशी जोडून असलेले नाळ ही अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.