चेहऱ्यावर तेज येण्यासाठी ९ लाखांचं इंजेक्शन; खर्च पालिकेकडून घेण्याचा प्रयत्न, पुण्यात बड्या अधिकाऱ्याचा कारनामा
पुणेः चेहऱ्यावर चमक यावी, चेहरा टवटवीत दिसावा यासाठी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचंड असे महागडे इंजेक्शन घेतले. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले. पण 'दिखाव्या'साठीचा तब्बल ९ लाखाचा खर्च महापालिकेच्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न होता. पण या प्रकरणाची बोंबाबोंब होऊन नाहक बदनाम नामुष्की ओढावण्याच्या शक्यतेने या खर्चाची बिले मागे घेण्यात आली. आरोग्य विभागाने बिले मंजूर केली नाहीत, पण याप्रकरणाची चर्चा मात्र रंगली आहे.
पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्य सेवेसाठी अंशदायी आरोग्य योजना राबविली जाते. त्यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांची तरतूद महापालिका करते. महापालिकेचे अधिकारी किंवा त्यांचे कुटुंबीयांना यांना दुर्धर आजारात या योजनेने मोठा आधार दिल्याने या योजनेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. दरम्यान महापालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याने व कुटुंबियांनी 'ग्लुटा थिओन' नावाचे इंजेक्शन घेतले. या इंजेक्शनची किंमत बाजारात ५० हजारांपासून ते १ लाखापर्यंत आहे. हे इंजेक्शन घेतल्यानंतर चेहरा टवटवीत होतो, त्वचेवर तेज येते.तसेच या इंजेक्शनमुळे यकृताचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो. अधिकाऱ्याने त्यांच्या कुटुंबीयांना हे इंजेक्शन घेतल्यानंतर त्याचं सुमारे ९ लाख रुपयांचे बिल आरोग्य विभागात सादर केले. त्या बिलावर स्कीन क्लिनिकचा उल्लेख असल्याने अधिकाऱ्यांनी व्यवस्थित तपासणी केली असता हे 'ग्लुटा थिओन' इंजेक्शन असल्याचे स्पष्ट झाले. हे बडे अधिकारी लवकरच सेवानिवृत्त होणार असताना त्यांनी अशा प्रकारचे बिल दिल्याने त्यावरून वादंग निर्माण झाला असता. तसेच त्यांची नाहक बदनामी झाली असती. त्यामुळे हे मंजूर करण्यात आले नाहीत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.