Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

५० कोटींचे बनावट टॅक्स रॅकेट, सोलापुरातील वकील साजिद शेखला अटक! कोल्हापूरच्या केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

५० कोटींचे बनावट टॅक्स रॅकेट, सोलापुरातील वकील साजिद शेखला अटक! कोल्हापूरच्या केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेची कारवाई
 


सोलापूर : सोलापुरात जीएसटीचे बनावट रॅकेट चालवणाऱ्या साजिद अहमद शेख या वकिलाला कोल्हापूरच्या केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने गुरुवारी (ता. २२) धडक कारवाई करत अटक केली. साजिद शेख याला न्यायालयात हजर केले, त्यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. त्यानंतर त्याची रवानगी कळंबा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात सुमारे ५० कोटी रुपये बनावट पावत्यांद्वारे त्याने वापरले गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

साजिद याने सोलापुरात ३० कंपन्यांचे जाळे तयार केले होते. त्यातील निम्म्याहून अधिक कंपन्या बनावट आहेत. मालाचा पुरवठा न करताच तो लोकांना बिले द्यायचा. काही दिवसांपूर्वी केंद्रीय जीएसटी गुप्तचर यंत्रणेने साजिद शेख याच्या सोलापूर येथील कार्यालयावर छापा टाकला होता. छाप्यात त्याचा कॉम्पुटर, मोबाइल आदी वस्तू जप्त केल्या होत्या. जप्त वस्तूंची फॉरेन्सिक उकल करण्यात आली. त्यातून जीएसटी गुप्तचर यंत्रणेने सोलापुरातील एकाच दिवशी १२ कंपन्यांच्या ठिकाणी छापे टाकून 'सर्च ऑपरेशन' केले होते. या सर्व माहितीच्या विश्लेषणातून साजिद याने १२ कंपन्यांमार्फत सुमारे ५० कोटींचा कर बनावट पावत्यांद्वारे वापरला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. सोलापुरातील साजिदच्या एकूण ३० कंपन्यांच्या तपासातून हा आकडा १०० कोटीपर्यंत जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

...तर होऊ शकतो पाच वर्षांचा कारावास

ही कारवाई जीएसटी कायद्यातील कलम १३२ खाली वरिष्ठ गुप्तचर अधिकारी अभिजीत भिसे, गुप्तचर अधिकारी वरुण सिंग, अतुल कुमार जैस्वाल यांनी पार पाडली. साजिद याने केलेला गुन्हा अजामीनपात्र आहे. या प्रकरणात त्याला किमान पाच वर्षे कारावासाची शिक्षा शक्य असल्याचे वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली.

आणखी ३० जणांवर संशय
साजिद शेख याने ३० कंपन्यांच्या माध्यमातून सोलापुरात रॅकेट चालवले. त्या कंपन्या ज्यांच्या नावे आहेत, त्या सर्वांची माहिती गुप्तचर विभागाने संकलित केली आहे. त्यांच्याकडेही आता तपास सुरू असून या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.