स्थानिकचे बिगुल वाजण्याआधीच काँग्रेसला सांगलीत धक्का; कट्टर समर्थक करणार राष्ट्रवादीत प्रवेश
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडल्या होत्या. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या आदेशामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
यामुळे इच्छुकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून स्थानिकची घोषणा येत्या चार आठवड्यात कधीही होऊ शकते. दरम्यान आता सगळेच पक्ष तयारीला लागले असतानाच मात्र सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथे विकासाच्या मुद्दयावर कट्टर समर्थकाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसचे नेते माजी मंत्री विश्वजीत कदम यांना धक्का मानला जातोय.
नुकताच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा निर्णय दिला. यामुळे गेल्या पाच एक वर्षापासून प्रशासकाच्या हातात स्थानिकच्या चाव्या आता पुन्हा एकदा नगरसेवकांसह जिप-पंचायत समिती सदस्यांच्या हाती जाणार आहेत. यामुळे आता जिल्हा पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून पक्षपातळीवर मोर्चे बांधणीला वेग आला आहे.
दरम्यान अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत चार माजी आमदारांना आपल्या राष्ट्रवादीत घेतलं होते. यामुळे आगामी स्थानिकच्या आधीच जिल्ह्यातील राजकारण तापलं असतानाच आता दुसरा धक्का काँग्रेसला अजित पवार यांनी दिला आहे. काँग्रेसचे पलूस येथे माजी नगरसेविका अंजनी मोरे यांचे पती अशोक मोरे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते काँग्रेसचे कट्टर समर्थक मानले जातात. पण आता विकास कामांच्या मुद्द्यावरून ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. तर त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीही जातील अशा चर्चा रंगल्या आहेत.
गेली वीस वर्षापासून काँग्रेसबरोबर असणारे मोरे आता राष्ट्रवादीत जाणार असल्याने हा सर्वात मोठा धक्का डॉ.विश्वजीत कदम यांना मानला जातोय. तर काँग्रेस पक्षाकडून म्हणावी तशी ताकद विकास कामांसाठी मिळत नसल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीत प्रवेश केला तरीही कदम यांनी आपल्याला दिलेले संधी विसरणार नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
कदम यांच्या कामांबाबत किंवा त्यांच्याबाबत आपल्या मनात कोणत्याही प्रकारचा रोष नसल्याचेही मोरे यांनी म्हटलं आहे. फक्त स्थानिक पातळीवर काम करताना आलेल्या अडचणीच्या वेळी काँग्रेस पक्षाने मदत केली नाही. त्यामुळे आता निलेश येसगुडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
दरम्यान पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पलूस पालिकेत पुन्हा एकदा वातावरण तापणार असून कधीकाळी स्वाभिमानीबरोबर असणारे नेते निलेश येसुगडे काँग्रेस फोडण्याच्या कामाला लागले आहेत. त्यांना यात आता पहिलेच यश आले असून मोरे त्यांच्या गळाला लागले आहेत. यामुळे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची एकत्र ताकद काँग्रसच्या डॉ. कदमांच्या विरोधात असणार हे पक्क झाले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.