चार वर्षांपूर्वी संपूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनामुळे जग लॉकडाऊनच्या विळख्यात अडकलं होतं. या काळात अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली, आजही कोरोना काळातील कटू आठवणी ताज्या आहेत. 2020 मध्ये आलेली कोरोनाची लाट 2022
मध्ये अटोक्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे, ती
म्हणजे काही देशांमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं आहे. यामुळे चिंता वाढली
आहे. सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णात वाढ झाली आहे, त्यामुळे
भारतात देखील चिंता व्यक्त केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतामध्ये
पुन्हा कोरनाची लाट येणार का? आली तर कोरोनाचा हा नवा विषाणू किती खतरनाक
असू शकतो. यामुळे किती नुकसान होऊ शकते, रुग्णाला काय त्रास होऊ शकतो या
सर्व प्रश्नांची उत्तर आरोग्य तज्त्र अविनाश भोंडवे यांनी दिली आहे, जाणून
घेऊयात.
नेमकं काय म्हटलं अविनाश भोंडवे यांनी?
सिंगापूरमध्ये कोरोनाचे नव्याने रुग्ण आढळल्यामुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याबद्दल चिंता करण्याचं काही कारण नाही, 2020 मध्ये सुरू झालेली कोरोनाची लाट 2022 मध्ये आटोक्यात आली. त्यावेळी कोरोनाचा विषाणू नष्ट झालेला नव्हता. त्यामुळे तो काही भागात डोकं वर काढेल असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते.मात्र भारताबाबत बोलायचं झाल्यास, काळजी करण्याचं काही कारण नाही. हा विषाणू भारतामध्ये सर्व पातळीवर पसरणार नाही. आता कोरोनाचे जे नवे व्हेरियंट येत आहेत. ते फारसे मारक नाहीत. गेल्या चार वर्षात कोरोना संपला असं जाहीर झाल्यानंतर देखील भारतात एखादा दुसरा रुग्ण सापडत होता, आपल्या देशात कोरोनाचा थोड्या-फार प्रमाणात शिरकाव होऊ शकतो, मात्र लाट येईल असं काही वाटत नाही. हा विषाणू संशोधकांना प्राण्यांमध्ये देखील सापडला आहे, कोरोनाचा विषाणू नवा असो किंवा जुना उपाय तेच आहेत, तो पुन्हा येऊ शकतो, पण घाबरू जाऊ नका काळजी घ्या असं भोंडवे यांनी म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.