आजरा : पत्नी पूजा सुशांत गुरव (वय ३१) यांचा छोट्या फावड्याने खून करून दरोड्याचा बनाव करणारा पती सुशांत सुरेश गुरव (३५) याला आज आजरा पोलिसांनी अटक केली. अवघ्या २४ तासांत स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपास करून मडिलगे येथील या प्रकाराचा पर्दाफाश केला. गुरव याने अनेकांकडून उसने पैसे तसेच बॅंकांकडून (Bank) कर्जे घेतली होती. ते परत करण्यासाठी तो पत्नी पूजाकडे दागिने गहाण ठेवण्यासाठी मागत होता; पण पूजाने नकार दिला. त्याचा राग मनात धरून त्याने तिचा खून करून दरोड्याचा बनाव केला, अशी माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुशांतने चौघा अनोळखी व्यक्तींनी रविवारी पहाटे घरात घुसून मारहाण केली व पत्नीचा खून करत १० लाख ३५ हजारांचा ऐवज लुटला, अशी फिर्याद आजरा पोलिस ठाण्यात दिली होती. आजरा पोलिस व स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. गुरव देत असलेली माहिती व प्रत्यक्ष घटनास्थळी मिळालेले संदर्भ यामध्ये तफावत आढळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादी गुरववरच पोलिसांचा संशय बळावला. घटनास्थळावरील परिस्थिती व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कौशल्याने गुन्ह्याची उकल केली. फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
सुशांत पत्नी पूजाकडे दागिने गहाण ठेवून बॅंकाची कर्जे व लोकांची देणी भागवूया. त्याला झालेल्या सोरायसीस आजारावर औषधोपचार करूया, असे म्हणत होता. रविवारी रात्री दोघांमध्ये वादावादी झाली. तुमच्या आजोबांच्या आजारपणावेळी सोने गहाण ठेवले होते. आता मी सोने देणार नाही. तुम्ही काय करायचे करा, असे पूजा म्हणाली. त्यामुळे सुशांतने रागाच्या भरात दगडाने, छोट्या फावड्याने पूजा यांच्या डोक्यावर एका पाठोपाठ प्रहार केले.या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागेवर मृत्यू झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांचे पथक तसेच सहायक पोलिस निरीक्षक नागेश यमगर, उपनिरीक्षक संजय पाटील, युवराज धोंडे आदींनी तपास केला.
तपासासाठी तीन पथके
पोलिसांनी तपासासाठी तीन पथके नेमली होती. त्यांनी गोपनीय माहिती यासह विविध बाबी तपासल्या. घराचा परिसर, घटनास्थळ याची माहिती घेतल्यावर त्यांचा सुशांतवरील संशय बळवला. पोलिसी खाक्या दाखवताच सुशांतने गुन्हाची कबुली दिली. सोने व पैशाची चोरी झाली नसल्याचेही सांगितले.
फेरीवाले गल्लीत फिरकलेच नव्हते
सुशांतने गल्लीमध्ये सतरंजी व फेरीवाले आल्याचे सांगत संशयाची सुई त्यांच्याकडे वळविली होती. त्याने सतरंजी खरेदी केल्याचेही सांगितले होते; पण गेली चार दिवस कोणताही फेरीवाला वा सतरंजीवाला गल्लीत फिरकला नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.
तपशिलात गेल्यावर संशय बळावला
गुरव याच्या घरापाठीमागे चिंचोळा बोळ आहे. या बोळाला लागून छोटा रस्ता आहे. या मार्गातून केवळ अर्ध्या तासात दरोडेखोर घरात घुसून महिलेचा खून करून लूटमार करतात आणि याची माहिती शेजारील घरात समजत नाही. हा प्रकार पोलिसांना संशयास्पद वाटला. त्यातून सुशांतवरील संशय बळावल्यावर त्याची चौकशी सुरू केली. त्यातून या प्रकरणाचा उलगडा झाला
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.