वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणने स्वतःच्या पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. 2019 साली निलेशने पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी बेडरूममधील सीलिंग फॅन आणि एसीमध्ये गुप्त कॅमेरे लावले होते. लाईट चालू ठेवत पत्नीवर शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करत असल्याचे उघड झाले आहे.
पत्नीने निलेशच्या लॅपटॉपमध्ये ही क्लिप्स पाहिल्यानंतर त्याला जाब विचारला असता, निलेशने तिला चाकू दाखवून धमकावले व गळा दाबून मारहाण केली. त्यानंतर बळजबरीने संबंध ठेवले. इतकंच नव्हे, तर तिचा छळ सुरूच राहिला आणि अखेर तिन पोलिसांत तक्रार दाखल केली. 14 जून 2022 रोजी त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.निलेश चव्हाणचा वैष्णवी हगवणेच्या सासरच्या कुटुंबीयांशीही जवळचा संबंध होता. तो करिश्मा हगवणेचा मित्र असून, शशांक व वैष्णवीमधील वादांमध्ये वारंवार हस्तक्षेप करत असे. 20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरचे लोक तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला न्यायला गेले असता, निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत घाबरवले आणि बाळाचा ताबा देण्यास नकार दिला.
कसपटे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून वारजे पोलीस ठाण्यात निलेशविरोधात धमकी व बाळाला बेकायदेशीररीत्या रोखून ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीच्या काकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे निलेशच्या दहशतीविषयी सांगितले आहे. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणात फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मागील सात दिवसांपासून फरार असलेल्या दोघांना 23 मेच्या पहाटे 4.30 वाजता पुणे पोलिसांनी पकडलं. यापूर्वी सासू, पती शशांक आणि नणंद करिश्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात वैष्णवीच्या शरीरावर जखमा व छळाचे स्पष्ट पुरावे मिळाले असून, ती आत्महत्या नव्हे तर छळामुळे झालेली घटना असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही प्रकरणाची दखल घेतली असून, तातडीने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.