यवतमाळ : आमदार, खासदार म्हटलं की बड्या महागड्या आणि अलिशान गाड्या आल्या. मात्र, आमदाराच्या कारवर कुऱ्हाडीने वार करण्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. झरी जामनी तालुक्यातील दुर्भा येथे ठेक्याने घेतलेल्या शेतात पेरणीवरून वाद झाला. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार यांची फॉर्च्युनर कार शेतात उभी होती. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले असता संशयित आरोपीने कुऱ्हाडीच्या सह्याने या फॉर्च्युनर वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यात, कारचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन पोलीस अधिक तपास करत आहेत.
सचिन भिमराव पंचरे (35) रा. दुर्भा यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेची 14 एकर शेती 2025 ते 26 या वर्षासाठी वार्षिक 70,000 रुपये दराने तीन वर्षांसाठी ठेक्याने घेतली आहे. त्यासाठी त्यांच्याकडे अधिकृत पोचपावती देखील आहे. पेरणीसाठी ते आपल्या मालकाच्या MH29BP0505 या क्रमांकाच्या वाहनासह शेतात गेले होते. त्यावेळी गावातील पेंन्टना गोंटीमुकुलवार, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा करण शेतात येऊन त्यांनी येतील शेतीवर आपला दावा केला. तसेच, या शेतातील पेरणी थांबवण्याचा प्रयत्न केला. हे शेत आमचे आहे, तुम्ही येथे पेरणी करु नका असेही त्यांनी म्हटले. यावेळी, सचिन पंचरे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या ठेक्याची माहिती दिली. मात्र, वाद वाढत गेला आणि पेंन्टना यांनी हातातील कुऱ्हाडीने शेतात आलेले माजी आमदाराचे वाहन फोडले. दरम्यान, आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पंचरे यांनी केली आहे. त्यानुसार, वाहनांची तोडफोड करणाऱ्याविरुद्ध पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कोण आहेत वामनराव कासावार
वामनराव कासावार हे वणी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. सन 2009 च्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा जिंकत मुंबई गाठली होती. त्यानंतर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपण निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे ते यवतमाळ जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.