नेवासा: देशी-विदेशी दारूचे 'भाव' सध्या गगनाला भिडल्यामुळे आता काही नशाखोर मंडळी 'ब्रँड' बदलत देशप्रेमी बनल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. दारूड्या लोकांची मैत्री ही कायम पक्की असल्याचे समाजात नेहमीच बोलले जाते.
मात्र, सध्या मद्याच्या भाववाढीमुळे ही उदार मैत्री ही 'दाता' शोधण्यात व्यस्त आहे. विदेशी दारू ढोसण्यासाठी दोन-चार मित्र एकत्र होऊनही एकमेकांचे 'पैसे' जमा करूनही केवळ एखाद्याच बाटलीचे जजमेंट होत असल्यामुळे त्यामध्ये कोणाचीच नशा भागत नाही. त्यामुळे एकमेकांचे मित्रच आता एकमेकांना 'कट' मारून चक्क देशी दारूच्या दुकानाकडे धाव घेतांना दिसू येऊ लागले आहेत. विदेशी मद्याच्या भाववाढीमुळे सर्वसामान्य, काबाडकष्ट करणारी मंडळी आता चक्क हातभट्टी गावठी दारू आणि फुग्यांचा आस्वाद घेताना दिसून येऊ लागली आहे. या दुकानांसमोर मद्यपींची गर्दी होत असून, बार चालकांना चांगलाच फटका बसला आहे.अचानक ब्रँड बदलामुळे मद्यपींची आर्थिक तारांबळ उडत असताना राज्य सरकारने देशी-विदेशी दारूवरील टॅक्स वाढविल्यामुळे देशी-विदेशी दारूचे मद्य भाववाढीवरही मात्र मद्यपींकडून चांगलीच टीका होतांना दिसून येऊ लागली आहे. अनेक जण राज्य सरकारच्या योजनांमुळे मद्याचे भाव वाढल्याचे सांगत आहेत.विदेशी मद्याच्या भाववाढीमुळे परमिट रूम, हॉटेल यांना मोठा फटका बसला असून, ते बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
गुपचूप घ्यायची अन् बिनधास्त घर गाठायचे!
अनेक दिवसांपूर्वी दोन-चार मित्र एकत्र येऊन पार्टी करत होते. त्यावेळी विदेशी मद्यही स्वस्त होते. सध्या या मद्याची भाववाढ झाल्याने एकत्र मित्रांचा घोळका आता कमी प्रमाणात दिसू लागला आहे. आपापली स्वतःची गुपचूप घ्यायची अन् बिनधास्त घर गाठायचे असा कार्यक्रम सध्या नेवासा फाटा परिसरात दिसत आहे.
परमिट रूममधील मद्यपींची संख्या रोडावली
नेवासा फाटा परिसरात मद्य विक्रीचे मोठे दुकान झाल्याने याचा छोट्या मोठ्यांना चांगलाच झटका बसल्याची चर्चा होत आहे. या मोठ्या दुकानात एमआरपीनुसार माल भेटत असल्याने काही दिवसांपासून नेवासा फाटा व परिसरातील परमिट रूम हॉटेल चालकांनी आपापल्या हॉटेलमध्येच बाहेरून आणलेले मद्य पिण्यास सक्त मनाई आहे. असे फलकच झळकत आहेत. त्यामुळेही परमिट रूममध्ये मद्य पिणार्यांची संख्या तुरळक दिसत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.