Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! लिपिकाने भंगारात विकल्या महत्त्वाच्या ५०० किलो फाईल्स!

धक्कादायक!  लिपिकाने भंगारात विकल्या महत्त्वाच्या ५०० किलो फाईल्स!
 

नागपूर : केंद्र सरकारच्या जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशांसाठी कार्यालयातील फाईल्स भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या सिव्हिल लाइन्स येथील व्हीसीए स्टेडियमसमोर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे नागपूर झोनल कार्यालय आहे. याच कार्यालयातील लिपिकाने हा धक्कादायक प्रकार केला आहे. 
 
या फाईल्सचे वजन सुमारे ५०० किलो होते आणि त्याच्या मोबदल्यात भंगारवाल्याने त्याला पाच हजार रुपये दिल्याची माहिती आहे.  प्राप्त माहितीनुसार, या कर्मचाऱ्याचे नाव मोहित गुंड असे असून त्याची नियुक्ती अनुकंपा तत्त्वावर इंदूर येथील सीजीएसटी कार्यालयात लिपिक म्हणून झाली होती. मात्र, मोहित गुंड नियमितपणे दारू पिऊन कामावर यायचा, शिवाय तो अनेकदा कार्यालयात अनुपस्थित राहायचा. त्यामुळे त्याची बदली नागपुरातील कार्यालयात करण्यात आली.

सीसीटीव्हीमुळे प्रकार उघडकीस
मोहित गुंड याने व्हीसीए स्टेडियमसमोरील सीजीएसटी रेंज कार्यालयातील अनेक महत्त्वाच्या फाईल्स रिक्षामध्ये भरून भंगारवाल्याला रद्दीच्या दराने विकल्या. फाईल्स गायब असल्याचे लक्षात येताच, सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये मोहित गुंड हा फाईल्स रिक्षामध्ये नेत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर संबंधित भंगारवाल्याला ५ हजार रुपये देऊन सीजीएसटी अधिकाऱ्यांनी त्या सर्व फाईल्स परत मिळविल्या. या प्रकारानंतर मोहित गुंड याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच, फाईल्सच्या सुरक्षिततेबाबत विभागीय स्तरावर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, यासंदर्भात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.