Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे : पुण्यात खाकीला डाग, पोलिसाने महिलेची केली फसवणूक, ७३ तोळे सोन्यासह १७ लाख लुबाडले

पुणे : पुण्यात खाकीला डाग, पोलिसाने महिलेची केली फसवणूक, ७३ तोळे सोन्यासह १७ लाख लुबाडले
 

पुण्यात खाकीला डाग लागला आहे. पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याने महिलेची फसवणूक करत ७३ तोळे सोने आणि १७ लाख रूपये लुबाडले आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या प्रतापामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. ओळखीचा फायदा घेत खोटं सांगून महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. गणेश अशोक जगताप असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 51 वर्षीय महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. चतुशृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी जगताप हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. या ओळखीचा फायदा घेत जगताप यांनी फिर्यादी व त्यांच्या पतीला वेगवेगळे कारणे देत त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली. "मी पोलीस खात्यात नोकरीला असल्यामुळे माझ्या नावाने बँकेतून कर्ज काढता येत नाही. माझ्याकडे ५ किलो सोने आहे. परंतू ते दुकानात मी गहाण ठेवलेले आहे. माझे मार्केटमध्ये १ कोटी रूपये आहेत. माझ्या नावावरील जमीन विक्रीचा व्यवहार लवकरच होणार आहे. त्यातुन येणाऱ्या रक्कमेतून तुमच्याकडून घेतलेली रक्कम व सोने परत करेन" अशी बतावणी जगताप यांनी केली.

त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जगताप यांना रोख रक्कम धनादेश आणि सोन्याच्या दागिन्यांच्या स्वरूपात मदत केली. फिर्यादी यांनी त्यांच्या जवळील एकूण ७३.५ तोळे सोने यापैकी जगताप यांनी २६ ऑक्टोबर २०१९ मध्ये २४.६ तोळे सोने घेतले आणि २ जानेवारी २०२० मध्ये ४८.९ तोळे सोने घेतले होते. यासोबतच फिर्यादी यांच्या मुलाकडून आणि पतीकडून वेळोवेळी रोख रक्कम सुद्धा घेतली "मी प्रॉपर्टी विकून तुमचे पैसे व सोन्याचे दागिने परत करेल" असे जगताप यांनी सांगितले मात्र फिर्यादी यांचे पैसे व दागिने अद्याप परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
२०२४ मध्ये देखील केली होती सराफाची फसवणूक

२१ ऑगस्ट २०२४ मध्ये जगताप यांची पोलिस मुख्यालयातून विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. मात्र हजर न राहता त्यांनी यादरम्यान आणखी एका सराफाला गंडा घातला. पुण्यातील औंध भागात असलेल्या एका सराफी व्यावसायिकडून जगताप यांनी पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून ८ लाख २२ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले होते. सराफी व्यावसायिकाने पैसे मागितल्याचा राग आल्याने जगताप यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे विशेष शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांचे निलंबन केले होते.

राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी दिले खोटे कागदपत्र
पोलीस प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक या पुरस्काराने सन्मानित केले जात. याच सर्वोत्कृष्ट पदकासाठी जगताप यांनी २०२१ मध्ये सरकारची फसवणूक केली होती. राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पुणे पोलिस दलातील गणेश जगताप सह 2 लिपिकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी पदक मिळावं यातही जगताप यांनी सेवा पुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करून त्याच्या आधारे खोटा दस्त तयार केला होता. या दस्तावर सुद्धा खोट्या सह्या करून त्यावर शिक्के मारत वेतनवाढीची झालेल्या कारवाईचे रेकॉर्ड नष्ट करून टाकले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.