राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधान परिषद गटनेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अंगावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपानंतर मुंब्र्यात आंदोलनाचा भडका उडाला. सय्यद अली अश्रफ (भाई साहब), शमीम खान आणि शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्र्यात मोठ्या संख्येने जमलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले, प्रतिमा पायाखाली तुडवली आणि 'मंगळसूत्र चोराला अटक करा, मंगळसूत्र चोराला बेड्या घाला!' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांच्या संतप्त घोषणांमधून पडळकरांविरोधातील रोष स्पष्ट दिसून येत होता. आंदोलनकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात निवेदन देत पडळकर यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली. शमीम खान यांनी यावेळी गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका करताना सांगितले, 'कालपरवाच आमदार झालेल्या पडळकर यांनी डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेली टिप्पणी म्हणजे सूर्यावर टीका करण्यासारखे आहे. डॉ. आव्हाड हे केवळ ज्येष्ठ आणि अनुभवी आमदारच नाही, तर जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे खरे लोकनेते आहेत.अशा व्यक्तीवर गाडी घालण्याचा प्रयत्न करणे हे केवळ असभ्य वर्तन नसून हिंसक राजकारणाचे लक्षण आहे.' खान पुढे म्हणाले की, 'जर पडळकर यांनी तात्काळ सार्वजनिक माफी मागितली नाही, तर ठाणे, मुंब्रा शहरातील चौकाचौकात त्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात येईल. इतकेच नव्हे तर ते या भागात आलेच तर त्यांची चोख नाकेबंदी केली जाईल.' शानू पठाण यांनीही यावेळी भाजप पक्षाला जबाबदार धरत मागणी केली की, 'गोपीचंद पडळकर यांच्यावर पक्षाने त्वरित निलंबनाची कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारचे वर्तन लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. हे केवळ डॉ. आव्हाड यांच्यावर नाही, तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेवर हल्ला आहे.'
नेमकं घडलं काय?
हा प्रकार बुधवारी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर घडला होता. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड धनंजय देशमुख यांच्यासोबत चालत असताना, गोपीचंद पडळकर यांनी अचानक गाडी थांबवून, दरवाजा उघडून आव्हाड आणि देशमुख यांच्यावर शिवीगाळ करत त्यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शरद पवार गटात तीव्र संतापाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी आजच्या आंदोलनातून हा संताप व्यक्त करत ठाणे शहरातील रस्त्यांवर निषेध नोंदवला. पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास राज्यभरात अशाच तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते आणि पडळकर यांच्यावर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.