सांगली : नांदणी (ता. मिरज) येथील सुप्रसिद्ध मठात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेला हत्ती अलीकडेच वनतारा प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात परिसरातील जनतेत तीव्र संताप व्यक्त होत असून, भारतीय जनता पार्टीच्या जैनप्रकोष्ठ सांगलीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर हत्ती परत नांदणी मठात पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात भाजपा जैनप्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांनी सांगितले की, "नांदणी मठ हा सुमारे आठशे गावांच्या धार्मिक आणि सामाजिक श्रद्धेचे केंद्र आहे. या मठातील हत्तीशी केवळ नांदणी नव्हे तर संपूर्ण परिसरातील जनतेच्या भावना जोडलेल्या आहेत. अनेक वर्षांपासून मठामध्ये उत्तम प्रकारे त्याची काळजी घेतली जात होती. त्याच्या आरोग्याची स्थिती देखील समाधानकारक आहे. त्यामुळे अचानक स्थलांतर हा निर्णय अत्यंत अन्यायकारक आणि भावनांवर आघात करणारा आहे." विशेष म्हणजे, या निर्णयामुळे फक्त जैन
समाजच नव्हे, तर परिसरातील अनेक इतर समाजघटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
हा हत्ती स्थानिक धार्मिक परंपरेचा आणि समवेत चालणाऱ्या विविध
जाती-धर्माच्या श्रद्धेचा भाग बनला होता, अशी भावना लोकांनी व्यक्त केली
आहे.
सदर प्रकरणात नेमलेल्या उच्चाधिकार समितीने हत्तीचा धार्मिक वापर करता येईल असा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या जैन समाजाच्या चातुर्मासकालीन धार्मिक कार्यक्रमासाठी तसेच पुढील धार्मिक कार्यासाठी हत्तीची नांदणी मठात तातडीने कायमस्वरूपी देणे आवश्यक आहे, अशी ठाम भूमिका जैनप्रकोष्ठने मांडली आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून हत्तीचे केलेले स्थलांतर त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्याला पुन्हा नांदणी मठात परत आणण्यात यावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा जैनप्रकोष्ठ सांगली विभागाची एक विशेष बैठक नुकतीच श्री. रावसाहेब पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस जैनप्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री. प्रशांत गोंडाजी, श्री. सागर पाटील, महावीर तकडे, प्रशांत कुंभोजे, अॅड कोनार्क पाटील, डॉ. ज्ञानचंद पाटील, रमेश आरवाडे, विनोद पाटील, स्वातीताई कोल्हापुरे, अंजलीताई पाटील, महेश मुळे, शांतिनाथ कर्वे, दीपक पाटील, अमित पाटील, राजगोंडा पाटील, तसेच मोठ्या संख्येने भाजप जैन प्रकोष्ठचे विविध पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत सर्वांनी एकमताने हत्तीच्या पुनर्स्थापनेसाठी संघर्ष उभारण्याचा निर्णय घेतला. हा विषय केवळ धार्मिक भावनांचा नसून परंपरेचा, सामाजिक समविचाराचा आणि स्थानिक जनतेच्या अस्मितेशी निगडित आहे. त्यामुळे शासनाने तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.