Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा हादरला, एकाच कुटुंबातील 4 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; नराधम नातेवाईक अटकेत

जिल्हा हादरला, एकाच कुटुंबातील 4 सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार; नराधम नातेवाईक अटकेत
 

अहिल्यानगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील एका गावात एकाच कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींवर त्यांच्या दूरच्या नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या नराधमाने फक्त अल्पवयीन मुलींनाच नव्हे, तर लग्न झालेल्या बहिणीलाही सोडले नाही. या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आई-वडील विभक्त झाल्याने सोपवली होती जबाबदारी
प्राथमिक माहितीनुसार, या चार बहिणींचे आई-वडील विभक्त झाल्याने त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती. परंतु, ज्यांच्यावर या मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी होती, तोच त्यांचा भक्षक बनला. गेल्या अनेक महिन्यांपासून हा नराधम त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करत होता. या प्रकरणातील पीडित मुली मूळच्या नाशिक जिल्ह्यातील आहेत. चार बहिणींपैकी एक मुलगी सज्ञान असून, तिचे लग्न झाले आहे. इतर तीन बहिणी अनुक्रमे 16, 14 आणि 10 वर्षांच्या अल्पवयीन आहेत.
लग्न झालेल्या बहिणीच्या धाडसामुळे उघडकीस आले प्रकरण

हे संपूर्ण प्रकरण लग्न झालेल्या मोठ्या बहिणीच्या धाडसामुळे उघडकीस आले. काही दिवसांपूर्वी ती आपल्या बहिणींना भेटायला त्यांच्या राहुरीतील घरी आली होती. यावेळी आरोपीने पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला. पतीने तातडीने अहिल्यानगरमधील 'स्नेहालय' संस्थेशी संपर्क साधला. स्नेहालयच्या 'उडान' प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने राहुरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वेगाने पावले उचलत, सर्व मुलींची सुटका केली आणि आरोपी दांपत्याला अटक केली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या कारवाईची माहिती दिली.

आरोपी दांपत्याला अटक, पुढील तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी नातेवाईकासह त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. आरोपीची पत्नी अत्याचाराच्या या प्रकारात सहभागी होती की नाही, याचा तपास पोलिस करत आहेत. सध्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांची पोलिस कोठडी मागण्यात येणार आहे. या घटनेमुळे समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी होती, त्याच व्यक्तीने अशा प्रकारे क्रूर कृत्य केल्यामुळे मानुसकीला काळीमा फासली गेली आहे. या प्रकरणात सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा तपास करण्याचे आश्वासन दिले आहे, जेणेकरून पीडित मुलींना न्याय मिळू शकेल. या गंभीर गुन्ह्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.